मुलाची आत्महत्या नव्हे तर खून झाला, सैन्यदलात असलेल्या वडिलांचा आरोप, सातवीत शिकणाऱ्या श्रीधरच्या आत्महत्येचं गूढ वाढलं
Madha Child Suicide : आपला मुलगा डावखुरा नव्हता, मग त्याने डाव्या हाताने पिस्तुलातून गोळी कशी झाडली असं म्हणत मृत मुलाच्या वडिलांनी त्याच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे.
सोलापूर: माढ्यातील एका 14 वर्षांच्या मुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण लागलं आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप सैन्यदलात नोकरीला असलेले त्याचे वडील गणेश नष्टे यांनी केला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करावा आणि न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
सैन्यदलात असलेल्या वडिलांच्या पिस्तुलमधून गोळी मारून घेऊन मंगळवारी माढा तालुक्यातील आलेगाव येथील श्रीधर गणेश नष्टे या सातवीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
इंदापूर तालुक्यातील सराटी येथील शाळेत सातवीमध्ये शिकणारा श्रीधर आजारी असल्याने शाळेत गेला नव्हता. दुपारची वेळ असल्याने घरातील सर्व मंडळी शेतात कामाला गेले होते. त्याचवेळी घरात कोणी नसताना श्रीधर याने वडिलांच्या पिस्तुलने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली होती. मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलगा उजवा, मग डाव्या हाताने गोळी कशी झाडेल?
त्यानंतर आता त्याचे वडील गणेश नष्टे यांनी आपला हा लहान मुलगा आत्महत्या करूच शकत नाही, तर त्याचा खून झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढू लागले आहे. गणेश नष्टे हे भारतीय सैन्यदलात सैनिक असून सध्या ते राजस्थान येथे सेवेत आहेत. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.
आपला मुलगा हा उजव्या हाताने सर्व गोष्टी करत असताना डाव्या हाताने गोळी कशी झाडली असा प्रश्न उपस्थित केला. याचसोबत आपले परवाना असलेले पिस्तुल हे कपाटातील दोन कुलुपात बंद होते. याशिवाय त्यातील मॅगेझीन दुसरीकडे ठेवली होती. असे असताना हा कुलुपे उघडून पिस्तुल घेऊन, त्यात गोळ्या भरून आत्महत्या करूच शकत नसल्याचा वडिलांचा दावा आहे.
अज्ञाताकडून खून झाल्याचा आरोप
सराईत व्यक्तीलाही इतक्या सहजासहजी पिस्तुल लोड करणे, त्याचे लॉक काढून फायर करणे शक्य होत नाही. अशावेळी सातवीत शिकणारा मुलगा हे कसे करू शकेल असा त्यांचा सवाल आहे . दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना मुलगा ही पिस्टल घेऊन आत्महत्येसाठी दुसऱ्या मजल्यावर कशाला जाईल असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या मुलाची अज्ञातांकडून हत्या झाली आहे. आता पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला कोणी गोळी मारली ते समोर आणावे अशी मागणी केली आहे.
सैनिक गणेश नष्टे यांच्या या आरोपानंतर या चिमुरड्याच्या आत्महत्येचं गांभीर्य अजून वाढले आहे. या परिसरात असणाऱ्या वस्त्यातील सर्वच ग्रामस्थ आपल्या शेतात कामाला गेल्याने गोळी झाडून घेतल्यानंतर जवळपास दोन ते अडीच तासाने हे उघड झाल्याचे सांगत यामुळे संशय वाढल्याचे वडील गणेश नष्टे यांनी सांगितले.
पोलिसांचा तपास सुरू
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत बोलताना टेंभूर्णीचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी पोलिसांचा तपास सुरु असून आत्महत्या झालेले पिस्तुल आणि घरात मिळालेले सर्व ठसे आणि इतर पुरावे तपासणीसाठी फॉरेन्सिक तपासणीला दिल्याचे सांगितले. यामध्ये मुलाच्या डोक्यात जिथून गोळी आत गेली व जेथून बाहेर पडली त्या दोन्ही ठिकाणाची त्वचा आणि केस देखील तपासणीला दिल्याचे त्यांनी माझाशी बोलताना सांगितले.
पंचनामा करताना श्रीधरच्या डाव्या हातात थोडे रक्त साकळलेले दिसत असून पिस्तुलने गोळी मारून घेताना त्या हाताला दणका बसला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच्या उजव्या हातावर असे कोणतेही निशाण आढळले नसल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले. आता महिनाभरात फॉरेन्सिकचा तपासणी अहवाल आल्यानंतरच यातून अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतील असे सांगितले .
वास्तविक, पिस्तुलचा परवाना वडील गणेश नष्टे यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेसाठी दिला गेलेला असताना ती इथे घरी कशी हा तपासाचा भाग आहे. याशिवाय त्यांना एकूण किती गोळ्या दिल्या होत्या, त्यातील त्यांनी किती वापरल्या आणि किती शिल्लक होत्या याचीही माहिती आता वडिलांकडून घ्यावी लागणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी माझाशी बोलताना सांगितले. आता फॉरेन्सिक अहवालानंतर या आत्महत्येमागील सत्य समोर येईल असेही पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले .
आता या चिमुरड्याच्या धक्कादायक आत्महत्येनंतर पोलिसांचा तपास सुरु आहे. हा तपास वेगात होऊन आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी वडील गणेश नष्टे यांनी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
ही बातमी वाचा: