प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काटेसह एकास जामीन; न्यायालयाकडून अटी व शर्ती
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशन आणि भाजप पदाधिकारी असलेल्या दीपक काटेसह त्याच्या साथीदारांनी शाईफेक आणि काळं वंगण ओतलं होतं

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin gaikwad) यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्लाप्रकरणातील आरोपी दीपक काटेसह त्याच्या एका साथीदारास अक्कलकोट न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 20 हजारांच्या जात-मचुलक्यावर तसेच वेगवेगळ्या अटी व शर्तीवर हा जामीन मंजूर करण्यात आला. प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेक, वंगणफेक हल्ल्याप्रकरणी आरोपी दीपक काटेसह 7 जणांविरुद्ध गुन्हा (Crime news) दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी, न्यायाधीश एम.एम. कल्याणकर यांच्या न्यायालयाने (Court) जामीन देत दिलासा दिला आहे. रविवारी 13 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट (जि, सोलापूर) याठिकाणी प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करत शिवधर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाईफेक केली होती.
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशन आणि भाजप पदाधिकारी असलेल्या दीपक काटेसह त्याच्या साथीदारांनी शाईफेक आणि काळं वंगण ओतलं होतं. या झटाफटीत मारहाण झाल्याचा आणि गाड्यांची तोडफोड झाल्याचा देखील आरोप प्रवीण गायकवाड यांच्याकडून करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर राज्यभरातील विविध संघटना व नेत्यांची निषेध व्यक्त केला. तसेच, पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी, आरोपी दिपक काटेसह 7 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक काटेसह आणि भुवनेश्वर शिरगिरे यांना पोलिसांनी अटक केली होती. आता, याप्रकरणी अक्कलकोट न्यायालयाने दोघांनाही अटी व शर्तींसह जामीन दिला आहे. दरम्यान, आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केल्याने संभाजी ब्रिगेड समर्थकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे. तसेच, भाजप नेत्यांचे पाठबळ दीपक काटेच्या मागे असल्याची टीकाही अनेकांनी केली आहे.
आरोपींनी पुढे तपासासाठी सहकार्य करण्याच्या अटी व शर्तीवर अक्कलकोट तालुका प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम.एम. कल्याणकर यांनी हा जामीन मंजूर केला आहे. तसेच, आठ दिवसाला अक्कलकोट किंवा सोलापूर या ठिकाणी पोलीस स्टेशनला दीपक काटे आणि भुवनेश्वर शिरगिरेला हजेरी लावावी लागणार आहे.
आमदार, खासदारांनी केला निषेध
प्रविण गायकवाड यांच्यावरील केलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी या हल्ल्याविरोधात निदर्शने केले जात असून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा
























