Sharad Pawar : एकाच दिवशी देशाचे दोन मोठे नेते सोलापुरात, 19 जानेवारीला शरद पवारही दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी यांच्यासह शरद पवारही 19 जानेवारीला सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलच तापणार असल्याचं म्हटलं जातंय.

सोलापूर : नाशिक आणि मुंबई दौऱ्यानंतर पुढच्याच आठवड्यात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर येतायत. सोलापूर शहरात 19 जानेवारी रोजी त्यांचा रोड शो आणि रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगोला आणि मंगळवेढा येथे कार्यक्रम घेतल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.
या दोन मोठ्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या दौऱ्यावेळी शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघाची राजकीय गणितं जुळवणार का हे पाहवं लागणार आहे. शरद पवार यांच्या सोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच शरद पवारांचे जुने सहकारी आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील आमदारही हजेरी लावणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सोलापुरात त्या दिवशी राजकीय फटकेबाजी पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.
या कार्यक्रमासाठी सगळे नेते एकाच मंचावर
सांगोल्याचे माजी आमदार कै डॉ गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांनी गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यासाठी 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शरद पवार हे सांगोल्यात पोहचतील. तसेच या कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे , विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकाप नेते आ जयंत पाटील यांची उपस्थिती असणार आहे .या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट , शिवसेना शिंदे गट आणि भाजप च्या अनेक आजीमाजी आमदारांनाही निमंत्रण करण्यात आलंय.
राजकीय फटकेबाजी पाहायला मिळणार?
यामध्ये पवारांवर कायम टोकाची टीका करणारे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , आमदार गोपीचंद पडळकर , आमदार जयकुमार गोरे , आमदार समाधान अवताडे असणार आहेत . याशिवाय सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील , आमदार राम सातपुते , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती आहे .पवारांचे जुने सहकारी आणि अजित पवार गटाचे आमदार बबनदादा, संजयमामा शिंदे , दीपक साळुंखे अशी दिग्गजांची उपस्थित असणार असल्याची माहिती देण्यात येतेय. या सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती असणार आहे .
माढा लोकसभा मतदारसंघासाठी चुरस
येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी माढ्याची जागा ही इंडिया आघाडीमधून शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे या जागेसाठी तितका ताकदवान उमेदवार नसल्यामुळे शरद पवार यांची या जागेसाठी चाचपणी सध्या सुरु आहे. त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक असल्याने या मतदारसंघातून महायुतीत नाराज असलेले महादेव जानकर , शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्या नावावर चर्चा सुरु आहे .
त्यातच काही दिवसांपूर्वी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माढा मतदारसंघासाठी डॉ अनिकेत देशमुख यांच्याही नावावर शरद पवार विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आता शरद पवार यांचा हा दौरा माढा लोकसभा मतदारसंघासाठी बेरजेचं राजकारण साधण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा सध्या आहेत. तसेच बऱ्याच वर्षांनी त्यांचे जुने सहकारी आणि माढ्याचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे एकाच मंचावर येतायत. माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे भाजप मधून उमेदवारीसाठी प्रयत्नात असून सध्यातरी भाजपने विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शरद पवार यांच्या या दौऱ्यात काय होणार याकडे भाजप लक्ष ठेवून असणार आहे.
हेही वाचा :
PM Modi Solapur Visit : पंतप्रधानआठवड्याभरातच पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, 19 जानेवारीला सोलापुरात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
