Solapur: पगार नसल्यानं शिपाई हणमंत काळेंची आत्महत्या, 14 तासानंतर कुटुंबियांचे आंदोलन स्थगित; शिक्षण विभागासह यलगुलवार प्रशालेचे लेखी आश्वासन
पगार नसल्याने आत्महत्या (suicide) केलेल्या हणमंत काळे (Hanmant Kale) यांच्या कुटुंबियांनी अखेर रात्री एक वाजता आंदोलन (Protest) मागे घेतले.
Solapur News : पगार नसल्याने आत्महत्या (suicide) केलेल्या हणमंत काळे (Hanmant Kale) यांच्या कुटुंबियांनी अखेर रात्री एक वाजता आंदोलन (Protest) मागे घेतले. काळे कुटुंबियांच्या मागण्यासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानं 14 तासानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. प्रहार शेतकरी संघटनेच्या मध्यस्तीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आणि यलगुलवार प्रशालेने लेखी आश्वासन दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मागील 13 वर्षापासून पगार न झाल्यानं बुधवारी (9 ऑगस्ट) सकाळी हणमंत काळे यांनी शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली होती. हणमंत काळे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी शिक्षण विभागावर आरोप केले होते. तसेच प्रशासनाकडे तीन मागण्या केल्या होत्या. लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका काळे कुटुंबियांनी घेतली होती. रात्री 9.30 ते रात्री 12.30 पर्यंत सुमारे तीन तास शिक्षण विभाग, शाळा प्रशासन, प्रहार संघटना आणि काळे कुटुंबीय यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर काळे कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे लिखित आश्वासन दिले आहे. त्यानंतर काळे कुटुंबियांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आज (गुरुवार 10 ऑगस्ट) हणमंत काळे यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणर आहे.
कुटुंबियांचे आरोप
जवळपास 13 वर्षांपूर्वी हणमंत काळे हे सोलापुरातील खासगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून भरती झाले. सुरुवातीला त्यांच्या नियुक्ती संदर्भात न्यायालयामध्ये प्रकरण सुरु होते. मात्र न्यायालयाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. त्यानंतर 2016-17 साली पगार सुरु करण्यासाठी शालार्थ आयडी बंधनकारक असल्याचा नियम करण्यात आला. तेव्हापासून हणमंत काळे यांचा प्रस्ताव शिक्षण विभागातील उपसंचालक कार्यालयात प्रलंबित होता. मात्र शालार्थ आयडीसाठी मंजूर करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यानेच शालार्थ आयडी दिला नाही. त्याच तणावातून मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा मृताचे वडील विठ्ठल काळे यांनी आरोप केला आहे.
दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, प्रहार संघटना आक्रमक
दरम्यान, हणमंत काळे यांच्या आत्महत्येनंतर प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळाले. हणमंत काळे यांची आत्महत्या नसून सिस्टिमने केलेला खून असल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेनं केला आहे. त्यामुळं दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका प्रहार संघटनेनं घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: