Solapur News : बैलगाडी काय, साधं पायी चालणे देखील मुश्किल! अखेर रुग्णाने खाटेवर बसून गाठलं घर; करमाळ्यातील संतापजनक प्रकार
Solapur News : ग्रामीण भागात रस्ते मंजूर होऊनही कामच होत नसल्याने रुग्णाला देखील नेताना खाटेवर बसून नेण्याची वेळ करमाळा तालुक्यात पाहायला मिळत आहे.

Solapur News : ग्रामीण भागात रस्ते मंजूर होऊनही कामच होत नसल्याने रुग्णाला देखील नेताना खाटेवर बसून नेण्याची वेळ करमाळा (Karmala) तालुक्यात पाहायला मिळत आहे. यापूर्वी दुर्गम भागातले असे व्हिडिओ सातत्याने पाहण्यात येत असताना आता करमाळ्यातही इतकी भीषण अवस्था सर्वसामान्य नागरिकांची होत आहे. करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथील रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की यातून बैलगाडी सुद्धा निम्म्यात अडकून पडते. यानंतर या बैलगाडीतील रुग्णाला नेण्यासाठी अखेर लोखंडी खाट मागून त्यावर त्याला बसविण्यात आले आणि परिसरातील नागरिकांनी ती खाट उचलून चिखलातून कसेतरी घरी पोहोचवले. या खांबेवाडी रस्त्यावर जिथे बैलगाडी देखील चालू शकत नाही तिथे बाकीची वाहने जाणेही अवघड आहे. या परिस्थितीत या मार्गावरून शाळेला जाणारी मुले गावातले ग्रामस्थ यांना अशा भीषण मार्गावरून दिव्य पार करीत हा रस्ता काढावा लागतोय.
आमदार निधीतून दहा लाख मंजूर; तरीही रस्त्याची दुरावस्था
पुढे आलेल्या माहितीनुसार, खांबेवाडी येथील केशव लवटे या तरुणाचा अपघात झाल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा त्याला घराकडे आणत होते तेव्हा बैलगाडी ही या भीषण रस्त्यावरील चिखलात फसली. अखेर परिसरातील ग्रामस्थांनी या रुग्णाला नेण्यासाठी लोखंडी कॉट आणून त्यावर त्याला बसविले आणि हा कॉट उचलत त्याला घरापर्यंत आणले. खरे तर या पाणंद मार्गाला शासनाची मंजुरी असून याला आमदार निधीतून दहा लाख मंजूर झाले आहेत. मात्र काही मंडळी हा मार्ग आडवत असल्याने या परिसरातील नागरिकांची अशी अवस्था बनली आहे.
साधं पायी चालणं देखील मुश्कील
करमाळा तहसीलदारांनी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल देत रस्ता करण्याचा आदेश दिला असूनही हा मार्ग तसाच अडकून पडला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकविलेला माल बाहेर आणण्यास किंवा बाहेरून खरेदी केलेल समान किंवा घरचा बाजार घराकडे घेऊन जाणे देखील अशक्य बनत चालले आहे . याचा सर्वात जास्त फटका लहान शाळकरी मुले आणि गावातील वृद्धांना बसत आहे. तातडीने प्रशासनाने यात लक्ष घालून हा मार्ग पूर्ण करण्याची मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























