कोकणाच्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळाय, सहा महिन्यात तुमचा भास्कर जाधव मंत्री म्हणून फिरेल; भर सभेत भास्कर जाधवांचा निर्धार
ही लढाई आपली आहे, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहाच महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधवच या भागात, या जिल्ह्यात, या राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेल, असा निर्धार भास्कर जाधवांनी व्यक्त केला आहे.
Bhaskar Jadhav : सहा महिन्यानंतर स्वाभिमानाने तुमचा भास्कर जाधवच (Thackeray Group MLA Bhaskar Jadhav) या भागांमध्ये मंत्री म्हणून फिरेल, असा निर्धार भास्कर जाधवांनी सिंधुदुर्गातील (Sindhudurg) भर सभेत बोलताना व्यक्त केला आहे. दिल्लीत (Delhi) सत्तेवर बसलेल्यांकडून राजकारणाचा (Maharashtra Politics) स्तर खाली घसरवण्याचं काम हे देश पातळीवर सुरू आहे, त्याचा परिणाम हा आता गावच्या पातळीपर्यंत येऊन ठेपलेला आहे, असंही ते म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) पक्ष आणि निशाणी काढून, चोरुन नेले असले तरीसुद्धा देशातले 28 पक्षांचे प्रमुख एकत्रित आल्यावर सर्वांमध्ये यजमान म्हणून उद्धव ठाकरे बसतात. देशाची सत्ता घ्यायची असेल तर उद्धव ठाकरेनांच पुढे करावं लागेल, असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, ही लढाई आपली आहे, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहाच महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधवच या भागात, या जिल्ह्यात, या राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेल. त्यामुळे आजपर्यंत जशी साथ निभावली, तशीच साथ निभवावी, अशी विनंतीही भास्कर जाधव यांनी केली आहे. तसेच, जिथे मी उभा राहील त्याठिकाणी सगळे माझ्या विरोधात तुटून पडणार आहेत. पण यांच्याविरोधात कोणीतरी लढलं पाहिजे, कोकणातल्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे, लक्षात ठेवा, असं सांगत भास्कर जाधव यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, "काही शिवसेनेचे आमदार बेरजेला घेऊयात आणि बाकीचे पाहुयात, असा यांचा डाव होता. तो शक्य झाला नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. भाजपवाल्यांनी दिलेला शब्द, आता पुन्हा भाजपवाले घराघरात दबक्या आवाजात जाऊन सांगतील, त्यांनी विश्वासघात केला. पण विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केलेला नाही. आठवा अमित शाह उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते. उद्धव ठाकरे त्यांना भेटायला कधी गेले होते? मात्र, अमित शाह दोन-दोन वेळा गेले. तिथे चर्चा झाल्यानंतर एक पत्रकार परिषद झाली, तिथे सर्वांच्या मध्ये देवेंद्र फडणवीस बसलेले, त्यांच्या एका बाजूला उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला अमित शाह होते. काय-काय घडलं हे सांगण्याची जबाबदारी फडणवीसांवर होती. त्यावेळी फडणवीसांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, सत्तेतील सगळ्यातला सगळा 50 टक्के - 50 टक्के वाटा असं ठरंल आहे. स्वतःच सांगतात आणि आता म्हणतात आम्ही खासगीत शब्द दिलेला नाही."
भाजपनं शब्द दिलेला, उद्धव ठाकरेच खरं बोलतायत : भास्कर जाधव
"उद्धव ठाकरे तुळजाभवानीची शपथ घेतायत, आपल्या आई-वडिलांची शपथ घेतायत. ते छत्रपती शिवरायांची शपथ घेतायत आणि सांगतायत मी खोटं बोलत नाहीये, आता मला भाजपला प्रश्न विचारायचाय, काही दिवसांपूर्वी अजित पवार आमच्यात बसलेले आणि नंतर तुमच्यासोबत आले याबाबतची चर्चा तुमची जाहीरपणे कधी झालेली. याचाच अर्थ तुमची चर्चा खोलीतच कुठेतरी झालेली, जाहीरपणे झालेली नव्हती.", असं म्हणत भास्कर जाधवांनी भाजपला थेट सुनावलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे ज्यावेळी रात्री-रात्री तुम्हाला भेटत होते, त्यांच्यासोबतचीही चर्चाही खासगी खोलीतच लपून-छपून चर्चा झालेली. पण ज्याअर्थी उद्धव ठाकरे सांगतायत बाळासाहेबांच्या खोलीत माझी चर्चा झाली होती, याचाच अर्थ उद्धव ठाकरेच खरं बोलत आहेत.
"शिवसेना फोडल्यानंतर भाजपनं सहा ते सात सर्वे केले, सगळ्या सर्वेंमधून एकच दिसतंय की, आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, तर एकट्या उद्धव ठाकरेंचे सगळे येतील, भाजपचे अवघे 28 येतील. आज भाजपचे शिवसेना धरुन 41 खासदार आहेत. पण उद्या जर निवडणूक झाली, तर भाजपचे अवघे सहा नाहीतर सातच खासदार येतील, असा अहवाल आहे.", असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली नाही. पण त्याच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या कामांना स्थगिती दिली आहे, असं म्हणत भास्कर जाधवांनी देवेंद्र फडणवीसांनी थेट निशाणा साधला आहे.
पाहा व्हिडीओ : Bhaskar Jadhav Ratnagiri : 'सहा महिन्यात तुमचा भास्कर जाधव मंत्री म्हणून या भागात फिरेल...'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मराठी माणसाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीला एकनाथ शिंदे जबाबदार; संजय राऊतांनी थेट सुनावलं