(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg News: सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किंगमेकरच्या नावाची चर्चा! उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण
रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण? याची चर्चा सुरू असताना उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव चर्चेत आहे.
रत्नागिरी : कोकणात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या घडामोडी घडू लागल्या आहेत. मतदारांमध्ये उमेदवार कोण? कुणाचं पारडं जड? कोणत्या पक्षाबद्दल सहानुभूती? याच्या चर्चा जोरात रंगत आहेत. अशावेळी आता राजकीय पक्ष आपले उमेदवारपदाचे चेहरे जनतेसमोर आणू पाहत आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेचा मतदारसंघ हा महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात सध्या भाजप देखील जोरदार तयारी करत आहे. कार्यकर्ता बांधणी, त्यांना कार्यक्रम देणे, नेत्यांच्या भेटी गाठी, बौद्धिक यासारख्या गोष्टी सध्या भाजपकडून होताना दिसत आहेत. शिवाय, रत्नागिरी - सिंधुदुर्गमध्ये 'कमळ फुलणार' अशी वक्तव्य भाजप नेते करत असल्यानं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काय होणार? याची उत्सुकता आतापासून लागून राहिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथील कार्याकर्ता मेळाव्यात केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ''माझे शासकीय निवासस्थान मुंबईत आहे. पण आपले शासकीय निवासस्थान दिल्लीत असले पाहिजे'' असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपले मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत लोकसभा उमेदवारीबाबत प्रकारे सुतोवाच केले. त्यामुळे किरण सामंत यांच्या लोकसभेतील उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण? याची चर्चा सुरू असताना उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उदय सामंत यांनी आता एकंदरीत या नावालाच दुजोरा दिलं असल्याची चर्चा उदय सामंत यांच्या विधानानंतर रंगली आहे.
सामंतांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
दरम्यान सामंत यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? याबाबत 'एबीपी माझा'नं रत्नागिरीमधील काही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ''उदय सामंत यांनी हे वक्तव्य आता केले असले तरी त्यात आश्चर्य वाटायला नको. किरण सामंत यांच्या नावाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. शिवाय, त्यांच्याकडून तशी तयारी तर सुरू नाही ना? अशा काही घटना घडत आहेत. किरण सामंत यांचा संपर्क देखील चांगला आहे. सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये त्यांचा वाढता वावर खूप काही सांगून जातो. उदय सामंत यांनी केलेल्या विधानाचा उदय सामंत दिल्लात जाऊ शकतात का? असा देखील अर्थ घेता येऊ शकतो. कारण, राजकारणात किंवा सत्तेत काही वर्षे गेल्यानंतर राजकीय इच्छा देखील वाढत असतात. त्यामुळे असा देखील त्याचा अर्थ घेता येईल. दरम्यान, शिंदे यांच्याकडे सध्या चांगला चेहरा नाही. तो त्यांना किरण सामंत यांच्या रूपानं मिळू शकतो. पण, सध्या भाजपची तयारी पाहता नेमका काय तोडगा निघणार? हे देखील पाहायाला हवी. अशी प्रतिक्रिया दिली.
किंगमेकर अशी ओळख
किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना किंगमेकर म्हणून रत्नागिरीमध्ये ओळखलं जातं. लोकांची विविध कामं हाताळताना किरण सामंत दिसून येतात. बांधकाम व्यवसायामध्ये असलेले किरण सामंत यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे. उच्च शिक्षित असलेले किरण सामंत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल देखील मिळवलेले आहे. सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील असून विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. पडद्यामागे असलेले किरण सामंत उदय सामंत यांच्यापाठी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते.
चर्चा कुणा कुणाच्या नावाची?
ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर, भाजपकडून माजी आमदार आणि नेते प्रमोद जठार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.