Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्याचे घाईगडबडीत अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच, जयंत पाटील उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार
Shivaji Maharaj Statue Collapsed : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विचारण्यात आला आहे.
मुंबई : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळल्याने त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आता घटनास्थळी जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे घाईगडबडीत केलेले अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचणारे असल्याची खंत जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून स्थानिक पातळीवर आंदोल करण्याचं आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून यासंबंधित एक निवदेन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्या निवदेनात खालील मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे,
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे घाईगडबडीत केलेले अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचणारे ठरले. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला.
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी थेट घटनास्थळी जाऊन याविरोधी आंदोलनाचा पुकारा दिला आहे. 28 ऑगस्ट 2024, सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ हे आंदोलन करण्यात येईल.
महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Shivaji Maharaj Sindhudurg Statue Collapsed : नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 35 पुतळी फुट्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती. मात्र, त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. यावरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची राळ उठवली आहे.
राज्य सरकारच्या दाव्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.