Sindhudurg News: कोकणातील समुद्रात विषारी जेलीफिशचे संकट, मच्छिमारांची चिंता वाढली
Sindhudurg News: कोकणातील समुद्रात विषारी जेलीफिश आढळून येत असल्याने मच्छिमारांची चिंता वाढली आहे.
Sindhudurg News: महाराष्ट्राला सुंदर अशी कोकण किनारपट्टी लाभली आहे. 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या किनारपट्टीवरील बहुतांश लोकांचा मत्स्य व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. आता कोकणातील याच मच्छिमारांसमोर विषारी जेलीफिशच (jellyfish) संकट उभं राहिले आहे. समुद्रात मासेमारीला घातक जेलीफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे माशांच्या उत्पादन देखील घट झाली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad) समुद्र किनाऱ्यावर जेलीफिश आढळून येत आहे. त्यामुळे मच्छिमार त्रस्त झाले आहेत. मासेमारीसाठी मच्छिमार खोल समुद्रात जातात. मात्र, त्यांच्या जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्य व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.
सध्या खोल समुद्रात जेलीफिश वाढल्याने जाळ्यात जेलीफिशचे प्रमाण जास्त असल्याने मासळी फार कमी मिळत आहे. त्यामुळे मच्छिमारीसाठी खर्च देखील सुटत नसल्याची परिस्थिती असल्याचे चित्र आहे. पर्यटन आणि मासेमारीवर अवलंबून असणार्याना मासेमारी व्यवसाय जेलीफिशमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. मासेमारीसाठी टाकलेली जाळीत विषारी जेलीफिशने भरून निघते. ही जेलीफिश जाळीतून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर हाताला खाज सुटते. विषारी जेलीफिश आणि मत्स्य उत्पादनात होणारी तूट यामुळे मच्छिमार संकटात सापडला आहे.
जेलीफिश सारखी नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील मच्छिमार मेटाकुटीला आल्याची परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले मधील वायंगणी समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले असता मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळयात अडकत असल्याने हैराण झाले आहेत. आधीच हवामान बदलाचा परिणाम मासेमारी होत असल्याने माशांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला मच्छिमार या जेलीफिशमुळे आणखी अडचणीत येऊ लागला आहे.
जेलीफिश एकलिंगी असून त्याचे नर-मादी सारखेच दिसतात. जेलीफिशाच्या प्रजातींनुसार त्यांचा आकार 3 सेमी ते 3 मीटरपर्यंत असतो. जेलीफिशाचे शरीर दोन स्तरांचे असते. याच्या शरीराचा भाग हा समुद्राच्या पाण्यासारखा पारदर्शी असतो. स्थूलमानाने जेलीसारखे दिसत असल्याने त्याला जेलीफिश म्हणातात. जेलीफिशला निमॅटिस म्हणजे विषारी दंश करणारे काटे असतात. त्यातून ते विषारी द्रव्य दंश करून शरीरात सोडतात. त्यामुळे हा दंश झाल्यावर पाय सुजणे, हातापायावर पुरळ येणे, त्वचा लाल होण्यासह श्वास घ्यायला त्रास होण्याच्या तक्रारी रुग्णांमध्ये आढळतात. जेलीफिशच्या बहुतांशी प्रजाती विषारी असतात.