विधानसभेची खडाजंगी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
Vidhansabha Election Sindhudurg District MLa List : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेचे मतदारसंघ, सध्याची राजकीय स्थिती आणि आमदारांची यादी याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Vidhansabha Election Sindhudurg District MLa List : राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्ग (Sindhudurg Assembly Constituency) जिल्ह्याचे एक वेगळं स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ असून सर्व ठिकाणी हायव्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या तर रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमांनी जोडण्यात आलं आहे. तर एका बाजूने अथांग अशा निळ्याशार समुद्राने वेढले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत लहान जिल्हा असून भौगोलिकदृष्ट्या डोंगरदर्यांनी वेढलेला आहे.
अथांग अशा निळ्याशार समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणमध्ये समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला आहे. त्याच किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. याच मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनारा जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तर ब्लू फ्लॅगच्या नामांकनासाठी वेंगुर्ल्यातील भोगवे समुद्र किनारा जगभरात प्रसिद्ध झाला आहे.
मालवणी भाषेचा आगळा वेगळा गोडवा इथल्या मातीत असून मालवणी भाषा देखील मच्छिंद्रनाथ कांबळी यांनी सातासमुद्रा पलीकडे नेली. त्याच मातीत कोकणी दशावतार हे शेकडो वर्षापासून लोककला म्हणून प्रसिद्ध आहे. मालवणी जेवण तर इथे आलेल्या पर्यटकांची पसंतीच असते.
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कायम प्रभाव पाडणारे सुसंस्कृत नेते म्हणून बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा जन्म सिंधुदुर्गातील वेंगुर्ले मधीलच. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच उकड पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार
कणकवली - नितेश राणे (भाजप)
कुडाळ - मालवण - वैभव नाईक (शिवसेना, ठाकरे गट)
सावंतवाडी - दीपक केसरकर (शिवसेना, शिंदे गट)
2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य
कणकवली - 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव केला. या निवडणुकीत नितेश राणे यांना 84 हजार 504 मते मिळाली होती. तर सतीश सावंत यांना 56 हजार 388 मते मिळाली होती. कणकवली विधानसभा मतदारसंघ हा राणेंचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नारायण राणे यांचा राजकीय वारसा चालवत नितेश राणे यांनी 2009 साली राजकारणात पाऊल ठेऊन पहिल्यांदाच कणकवली विधानसभा मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने काँग्रेसकडून निवडून आले. 2014 साली भाजपच्या प्रमोद जठार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणकवली कासार्डेत भव्य सभा घेऊनही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. नारायण राणे कणकवली मालवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले. त्यानंतर 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यात कुडाळ-मालवण असा मतदारसंघ झाला. या 2009 च्या कुडाळ-मालवण या मतदारसंघात नारायण राणे पुन्हा एकदा निवडून आले. सलग सहाव्यांदा विधानसभेत विक्रमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर 2014 साली नारायण राणे यांचा बालेकिल्ला ढासळला.
कुडाळ मालवण - कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात 2019 सालच्या निवडणुकीत शिवसनेच्या वैभव नाईक यांनी भाजपच्या बंडखोर उमेदवार रणजित देसाई यांचा पराभव केला होता. याच मतदार संघात नारायण राणे यांचा शिवसेनेचे वैभव नाईक यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10 हजार मताधिक्याच्या फरकाने नारायण राणे यांचा पराभव करून जॉईंट लीडर म्हणून राज्यात नावारुपास आले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कडून माजी खासदार निलेश राणे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून महाविकास आघाडीकडून वैभव नाईक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
सावंतवाडी - सावंतवाडी मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी भाजपच्या बंडखोर उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. दीपक केसरकर यांना 69 हजार 784 मतं मिळाली होती. तर राजन तेली यांना 56 हजार 556 मतं मिळाली होती. दीपक केसरकर यांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच तीनदा विजयी होण्याची कियमा केली आहे. दीपक केसरकर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस कडून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेने कडून निवडून आले. सध्या ते शिवसेना शिंदे गटात असून आताच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. सावंतवाडी मतदारसंघात महायुतीतच इच्छुक उमेदवारांचा मोठा भरणा असून शिंदे शिवसेनेकडून दीपक केसरकर तर भाजप कडून राजन तेली, विशाल परब असे महायुतीकडून इच्छुक उमेदवार आहेत. तर आघाडी कडून शरदचंद्र पवार गटाचे अर्चना घारे, ठाकरे गटाचे शैलेश परब आणि काँग्रेसकडून विलास गावडे हे इच्छुक आहेत.
हे ही वाचा :