Helium Day : विजयदुर्ग किल्ला हेलियमच्या शोधाचा साक्षीदार, गडावर साजरा झाला जागतिक हेलियम दिन
Helium Discovery Day : विजयदुर्ग किल्ल्यावर आज हेलियम दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिकांसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला होता.
सिंधुदुर्ग : जागतिक हेलियम दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम दिन (Helium Discovery Day) साजरा करण्यात आला. 18 ऑगस्ट 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला होता. त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचे माहेरघर म्हणून देखील संबोधले जाते. सिंधुभूमी फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने मागील 15 वर्षे हेलियम डे साजरा केला जातो. या सोहळ्यात शालेय विध्यार्थ्यांसह जिल्हावासीय सहभागी झाले होते. या दिनाचे औचित्य साधून विजयदुर्ग किल्ल्यावर खगोलशास्त्र आणि आरमार म्युझियम लवकर बांधण्यात येणार असल्याची माहिती सिंधुभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले
असा लागला हेलियमचा शोध
हेलियम वायू ज्या ठिकाणावरून शोधला त्या जागेला 'साहेबांचा ओटा' म्हणून ओळखले जाते. याच साहेबांच्या ओट्यावर आज विजयदुर्गवासीयांनी हेलियम दिवस साजरा केला. 18 ऑगस्ट 1868 मध्ये सूर्यकिरणाचे निरीक्षण करत असताना हेलियम वायूचं निरीक्षण केले गेले. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून हेलियम हे नाव पडले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर सर जोसेफ नॉर्मन लॅकियर यांनी 155 वर्षांपूर्वी सूर्यग्रहणाचे निरीक्षण करतेवेळी या हेलियम वायूचा शोध लावला होता. त्यामुळे हेलियम वायू ज्या ठिकाणावरून शोधला त्या जागेला साहेबांचा ओटा म्हणून ओळखले जाते. याच साहेबांच्या ओट्यावर आज विजयदुर्गावर 'हेलियम दिवस' साजरा केला.
हेलियम हा असा एक वायू आहे, की जो प्रथम पृथ्वीवर न शोधता अवकाशात शोधला गेला. त्याचा अणूक्रमांक 2 आहे. हा रंग, वास व चवविरहित असा वायू आहे. हा बिनविषारी आणि एकाणू वायू आहे. हेलियम वायूचा उपयोग स्कूबा डायव्हिंग, एमआरआय यंत्रामध्ये चुंबकासाठी शीतकारक म्हणून तसेच बलून्समध्येही हेलियमचा वापर होतो. स्कूबा डायव्हर्सना श्वास घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टाकीत 20 टक्के ऑक्सिजन आणि 80 टक्के हेलियम वायू असतो. स्कुबा डायव्हर्सना अतिरिक्त वजन घ्यावे लागू नये म्हणून हा उपयुक्त ठरतो.
तीन शास्त्रज्ञांना मान
फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्युलस जेनसिन याने सूर्यग्रहणाच्या वेळी पिवळ्या ज्वाळेच्या रुपात हेलियम शोधला. जोसेफ नॉर्मन लॅकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञानेही सूर्यावर पिवळी रेषा पाहिली. दोन्ही शास्त्रज्ञांची निरीक्षणे फ्रेंच सायन्स अॅकॅडमीकडे एकाच वेळी पोहोचली म्हणून हेलियमच्या संशोधनाचे श्रेय दोघांकडेही गेलं. मात्र त्या वेळी इतर शास्त्रज्ञांना या दोघांच्या निरीक्षणावर आणि नवीन वायूच्या शोधावर विश्वास नव्हता. 30 वर्षांनंतर स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ विल्यम रॅमसे याने युरेनियमच्या खाणीत पृथ्वीच्या पोटातील एक नवीन वायू शोधला. शेवटी तिन्ही शास्त्रज्ञांचा फ्रेंच सरकारने सुवर्णपदके देऊन सत्कार केला. अशाप्रकारे हेलियमच्या संशोधनात तिन्ही शास्त्रज्ञांचे नाव घेतले जाते.