shiv Sena : मोठी बातमी! यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही; शिंदेंच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत
Sindhudurg Politics : आतापर्यंत कोणतीही निवडणूक हरलो नाही, मी पदाला चिकटून राहणारा माणूस नाही असं वक्तव्य शिंदे गटातील बड्या नेत्याने केलं.

सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. राजकारण हे निवडणुकांपुरतं असते, पदाला चिकटून राहणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं जाहीर वक्तव्य दिपक केसरकर यांनी केलं. सावंतवाडीतील (Sawantwadi) एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं. त्यामुळे दीपक केसरकर राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
"निवडणुका आल्यावर विरोधकांना थोडी भीती वाटणार आहे. पण भीती बाळगू नका. मी काही पदाला चिकटून राहणार नाही. जनतेची शक्ती कोणी ओळखू शकत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही ती ओळखता आली नाही. त्यामुळे मला पक्ष बदलावा लागला. पण कुठेही गेलो तरी निवडून आलो."
दीपक केसरकर म्हणाले की, "स्वार्थासाठी राजकारण करु नका, लोकांसाठी राजकारण करा. तसे केल्यास तुम्ही कोणतीही निवडणूक हरणार नाही. मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. तुमचे कायम प्रेम ठेवा."
दीपक केसरकरांनी या आधीही राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. नुकत्याच त्यांनी केलेल्या या ताज्या वक्तव्यानंतर ते राजकारणातू निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिपद नाकारल्यानंतर नाराज असल्याची चर्चा
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदं नाकारण्यात आली होती. त्यामध्ये दीपक केसरकरांचं नावही होते. शिंदे मुख्यमंत्री असताना दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी घेतलेले 'एक राज्य एक गणवेश योजना' आणि पाठ्यपुस्तकांना वहीची पाने लावण्याचा निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतला. त्यामुळे दीपक केसरकर काहीसे नाराज असल्याची चर्चा होती.
माझं मंत्रिपद देव ठरवतो
मंत्रिपदावरुन डावलल्यानंतर एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर दीपक केसरकर चर्चेत आले होते. दीपक केसरकर म्हणाले होते की, "अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आनंदात आहे."
आपण मंत्रिपदापेक्षाही मोठ्या पदावर काम करु असा विश्वास त्यावेळी दीपक केसरकरांनी व्यक्त केला होता.
ही बातमी वाचा:























