उदय सामंतांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कणकवलीत बॅनर, समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
Sindhudurg News Update : उदय सामंत समर्थकांनी बॅनरची फी भरून परवानगी घेतली आणि हटवलेला बॅनर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात आला.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samantha) यांच्यावर पुणे येथील कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याचा कणकवलीत बॅनर लावून निषेध करण्यात आला आहे. या बॅनरवरून पोलीस आणि शिंदे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली.
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे समर्थक गटाकडून बॅनर लावण्यात आला आहे. कणकवली तालुक्यातील शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात सत्ता बदलानंतर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे बंडखोर शिंदे गटात सामील झाले. मात्र, उदय सामंत यांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर या हल्ल्याच्या निषेधाचा बॅनर कणकवलीत लावण्यात आला. या बॅनरच्या एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दीपक केसरकर यांचे फोटो आहेत. तर खाली शिवसेना शिंदे गट असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हा बॅनर लक्षवेधी ठरत आहे.
हा बॅनर लावल्यानंतर लगेच पोलिसांकडून तो उतरवण्यात आला. त्यानंतर पोलीस आणि शिंदे गट यांच्यात बाचाबाची झाली. याला कारण म्हणजे परवानगी नसल्याचे सांगत बॅनर काढण्यात आला. मात्र, थोड्या वेळात परवानगी घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी हा बॅनर लावण्यात आला.
बॅनर पुन्हा लावला
उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लावण्यात आलेला बॅनरसाठी नगपंचायतीकडून परवागनगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे बुधवारी सायंकाळी नगरपंचायतीने तो काढून नगरपंचायत कार्यालयात जमा केला. त्यानंतर उदय सामंत समर्थकांनी नगरपंचायतीमध्ये धाव घेऊन बॅनरची फी भरून परवानगी घेतली आणि हटवलेला बॅनर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात आला.
दरम्यान, या बॅनरवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जिल्ह्यातील वातावरण स्थिर आहे.
महत्वाच्या बातम्या