छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलवणार; दीपक केसरकर यांचं विधान
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सदर घटनेवरुन कोणालाही राजकारण करण्याचा अधिकार नाही, असंही मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue सिंधुदुर्ग: नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून, कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सदर घटनेवरुन राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत सदर प्रकरणावर भाष्य केलं आहे. सदर घटनेवरुन कोणालाही राजकारण करण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली. ते पहिले नौसैनिक राजा होते...ही घटना अतिशय दुःखद आहे, असं दीपक केसरकरांनी सांगितले.
100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल-
छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता. या पुतळ्याची उंची 28 फूट होती. परंतु नागरिकांची मागणी होती की, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फूटांचा पुतळा उभारण्यात यावा. 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल...तो राष्ट्राचा सन्मान असेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीप्रमाणे मजबूत पुतळा उभारला जावा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धरतीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभा करू शकतो. यावेळी भव्य असं स्मारक उभारताना परिसराचा विकास करू, असं विधानही दीपक केसरकरांनी व्यक्त केलं.
वाईटतातून चांगलं घडायचं असेल...
वाईटतातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात झाला असेल. संपूर्ण परिसराचा विकास करणे आणि पुतळा उभा करणे ही खरी आदरांजली असेल. उद्या मुख्यमंत्र्यांना माझ्या भावना सांगणार, सिंधुदुर्गवासीयांच्या भावना सांगणार आहे. चांगले सल्ले स्वीकारले जातील आणि पुन्हा पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होईल, हा महाराष्ट्राचा सन्मान असेल, असं मत दीपक केसरकरांनी व्यक्त केलं आहे.
स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटलांनी आरोप फेटाळले
याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, मी संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले नव्हते. मी केवळ पुतळ्याच्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होते. शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा कामाचा आणि आपला कोणताही संबंध नाही, असे चेतन पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता ठाण्यातील संबंधित कंपनीवर पोलीस गुन्हा दाखल करणार का, हे बघावे लागेल.