(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra : गप्प बसून आराम करा; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना सल्ला
Maharashtra : उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut ) यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड बंद करावं, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग : "शिवसेनेच्या (Shiv Sena)आजच्या परिस्थितीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. याला संजय राऊत (Sanjay Raut ) जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा, असा टोलेवजा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे.
नारायण राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी सावंतवाडीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने कोणते प्रश्न सोडवले असा प्रश्न उपस्थित करत नवीन सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच लोक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी काम करेल असा विश्वास यावेळी राणे यांनी व्यक्त केला.
"उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड बंद करावं, ज्यांना मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाहीत ते मतदार काय सांभाळणार? महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले? उलट आमच्या कुटुंबीयांना नोटीस बजाविण्याचे काम त्यांनी केले. अडीच वर्षांमध्ये स्वतःच्या आमदार खासदारांना आठ आठ तास भेटण्यासाठी प्रतिक्षेत ठेवायचे, त्यांची कामे करायचे नाही. केवळ मातोश्रीच्या आप्तांचीच कामे करायची हा एक कलमी भ्रष्टाचार त्यांनी केला, असा आरोप नारायण राजे यांनी केला.
नारायण राणे म्हणाले, "आपण वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे सांगत होतो. कारण मला आधीच याची कल्पना होती. आता शिवसेनेच्या चिन्हावरून उभा राहिलेला प्रश्न कायद्याच्या बाबीवर अवलंबून आहे. येत्या 11 जुलै रोजी होणाऱ्या निर्णयानंतर पुढील हालचाली घडून येतील. नवीन सरकार जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच हे राज्य लोक कल्याणकारी राज्य बनावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे."
दरम्यान, नवीन सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये नितेश राणे यांना संधी असेल का? याबाबत बोलताना मंत्र्यांच्या नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला घेऊन गेल्याचे नारायण राणे म्हणाले.