(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोक म्हणाले माझे सिनेमे चालणार नाहीत, मी रेस्टोरंट उघडण्याचा विचार केला, 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख भरभरुन बोलला
Shah Rukh Khan : 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
Shah Rukh Khan : 'पठाण' (Pathaan) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शाहरुख म्हणाला,"जगभरातील सिने-प्रेक्षक 'पठाण' सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी 'पठाण'ला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाकाळात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या सिनेमाचा भाग असलेल्या प्रत्येकाने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे सिनेमाचं यश हे सर्वांचं आहे. 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल शाहरुखने दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, सिद्धार्थ आनंदचेदेखील आभार मानले.
शाहरुखसाठी 'ते' चार वर्ष कसे होते?
शाहरुख खानने 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. 'पठाण'आधी त्याचा 'झिरो' (Zero) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. आता 'पठाण' सिनेमाच्या यशानंतर गेल्या चार वर्षांबद्दल भाष्य करताना शाहरुख म्हणाला,"माझ्या आयुष्यातील 'या' चार वर्षांत काही चांगल्या गोष्टी घडल्या तर काही वाईट गोष्टी घडल्या. या चार वर्षांत मी मुलांसोबत वेळ घालवला, त्यांना मोठं होताना पाहिलं".
चार वर्षात काय केलं यावर बोलताना शाहरुख पुढे म्हणाला,"माझा 'पठाण' आधीचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे प्लॅन बीच्या दृष्टीने विचार करत मी जेवण बनवायला शिकलो. मी इटालियन जेवण बनवायला शिकलो. लोक म्हणाले की, आता माझे सिनेमे चालणार नाहीत, म्हणून मी रेस्टॉरंट उघडण्याचा विचार केला. लोकांना आनंद वाटण्याचा प्रयत्न केला. आता 'पठाण' सिनेमाच्या यशामुळे मी मागचे चार वर्ष विसरलो आहे".
शाहरुख पुढे म्हणाला,"मी लोकांपर्यंत आनंद पसरवू शकेन ही मनापासून इच्छा आहे आणि या सिनेमाच्या माध्यमातून मला आनंद शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आदित्य आणि सिद्धार्थ आनंद यांचा मी कायम ऋणी राहीन ज्यांनी मला काम करण्याची संधी दिली. मी जॉन, दीपिका, आदित्य, सर्वांचे आभार मानतो. 'पठाण' हा सिनेमा एवढा मोठा सुपरहिट ठरला आहे यावर आम्हाला अजूनही विश्वास बसलेला नाही. प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम मी करत आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा मी प्रयत्न करत नाही. सर्व धर्मांच्या मंडळींसाठी आम्ही सिनेमा बनवणार आहोत. ".
संबंधित बातम्या