Satara News : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणं प्रियकराला महागात, मुलं चोरणारा व्यक्ती समजून बेदम चोप
Satara News : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाण्याची आयडिया प्रियकराला भलतीच महागात पडली. मुलं चोरणारा व्यक्ती समजून लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघेही विवाहित आहेत.
Satara News : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. प्रेमात असलेले प्रियकर आणि प्रेयसी कोणत्याही अडचणींना, आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार असतात. एकमेकांना पाहण्याची किंवा भेटण्याची ओढ कोणाला काय करायला लावेल सांगता येत नाही. साताऱ्यात (Satara) प्रेमाचा असाच आगळावेगळा प्रकार समोर आला. प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा (Burka) घालून आला. परंतु ही आयडिया प्रियकराला भलतीच महागात पडली. मुलं चोरणारा व्यक्ती समजून लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघेही विवाहित आहेत.
राज्यभरात सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरली असून पालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मुलं चोरणारे लोक समजून अनेकांना नाहक मार खावा लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. साताऱ्यातही अशीच घटना घडली. बुरखा घाललेली व्यक्ती महिला नसून पुरुष असल्याचं समजताच लोकांनी त्याला पकडलं आणि बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.
साताऱ्यातील तामजाईनगरमधीला ही घटना आहे. एक व्यक्ती बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तिथल्या एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडलं. यावेळी बुरख्यात स्त्री नसून पुरुष असल्याचे लक्षात येताच हा मुले पळवायला आला की काय, अशा संशय आल्याने त्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच आपण प्रेयसीला भेटायला आल्याचे कबूल केलं आणि पोलीसही चक्रावले. प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघेही विवाहित आहे. पण प्रेयसीला वेश बदलून येणे या प्रियकराला चांगलेच महागात पडले.
ठाण्यातील दिव्यात मुलं चोरणारा व्यक्ती समजून एकाला मारहाण
ठाण्याच्या दिव्यात गैरसमजातून एका व्यक्तीला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (30 सप्टेंबर) घडली. काल दुपारी एक वाजता दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनीमध्ये एक हॉटेल कर्मचारी चिकन घेत होता. दरम्यान त्याने मुलांकडे पाहिलं. यामुळे हा व्यक्ती मुलं चोरतो असा गैरसमज झाला. यानंतर तिथल्या नागरिकांनी त्याला बेदम महाराण केली.
मुलं पळवणारी व्यक्ती/टोळी समजून निष्पापांना मारहाण
सोशल मीडियावर सध्या मुलं पळवणाऱ्या टोळी संबंधित अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. राज्यातील काही ठिकाणी मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. सांगलीत एका महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली तर चाळीसगावात एका निराधार महिलेला मारहाण केली. असाच प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचं समोर आलं आहे.