Phaltan : राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फलटणमध्ये तिकीट, तरीही रामराजे प्रचारात नाहीत; अजित पवार करणार कारवाई
Ramraje Nimbalkar : फलटणमध्ये महायुतीतून सचिन कांबळे यांना तिकीट मिळालं असलं तरी रामराजे निंबाळकर मात्र त्यांच्या प्रचारात दिसत नाहीत.
सातारा : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये लढत होताना पाहायला मिळते. परंतु अजितदादांच्या गटात असलेले रामराजे निंबाळकर हे प्रचारात दिसत नसल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यावर रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस पाठवण्यात येईल असं अजित पवार म्हणालेत.
रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार ते करत नसल्याची चर्चा आहे. त्यानंतर अजित पवारांनी नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. रामराजे यांचे दोन्ही बंधू, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतली आहे.
राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले दीपक चव्हाण यांनी देखील 14 ऑक्टोबरला तुतारी हाती घेतली आणि या पक्ष प्रवेशावेळी रामराजे हे आमच्याच सोबत असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणले होते. दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेण्याआधी अजित पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती.
रणजित नाईक निंबाळकरांच्या निकटवर्तीयाला राष्ट्रवादीतून तिकीट
दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना तिकीट मिळाले. सचिन कांबळे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय आहेत. रणजित नाईक निंबाळकर यांनी फलटणची जागा भाजपला सुटावी अशी मागणी केली होती. परंतु राष्ट्रवादीने जागा भाजपला न सोडल्याने सचिन कांबळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
रामराजे नाईक निंबाळकर आणि माढाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे जमत नाही. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेतली. माढा मतदारसंघातून महायुतीतून रणजित नाईक निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिले होते. त्यावेळी रणजीत निंबाळकर यांच्या तिकीटला रामराजे यांनी विरोध केला होता. रामराजे आणि संजीवराजे वगळता कुटुंबातील इतर सदस्यांनी रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यानंतर रणजित नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला.
रामराजेंना नोटीस देणार
आता रामराजे महायुतीत आहेत. महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला फलटणची जागा सुटली आहे. रामराजे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाला जागा सुटली आहे. तरीही रामराजे प्रचारात दिसत नाही. त्यामुळे अजित पवारांनी नोटीस देण्याची भाषा केली आहे. सचिन कांबळे हे जरी घडाळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढत असले तरी ते रणजित नाईक निंबाळकर यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे रामराजे उमेदवाराचे काम करत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवारांनी नोटीस देण्याची भाषा केल्यानंतर रामराजे प्रचारात सक्रिय होणार का? की पडद्यामागून तुतारीला मदत करणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.
ही बातमी वाचा: