Satara Loksabha : अर्ज भरण्यासाठी चार दिवस राहिले तरी सातारच्या उमेदवारीचा पत्ताच नाही! पाडव्याचा मुहूर्त साधणार?
Satara Loksabha : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी सातत्याने चाचपणी सुरू आहे. मात्र, अजूनही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही.
सातारा : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात फक्त महायुतीकडून रणजित सिंह निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दोन्ही मतदारसंघांमध्ये अजूनही उमेदवार देण्यात आलेला नाही. दुसरीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित जात मानली जात असली, तरी त्यांना अजून उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी चार दिवस राहिले तरी लढतीचे चित्र स्पष्ट कधी होणार? अशीच विचारणा सातारच्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
शरद पवार कोणाला संधी देणार?
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी सातत्याने चाचपणी सुरू आहे. मात्र, अजूनही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी कोण उमेदवार असणार अशी चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. मात्र, अजूनही त्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या मुलाला उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
त्यामुळे शशिकांत शिंदे यांना संधी दिली जाणार की श्रीनिवास पाटील यांच्या पारड्यामध्ये मत टाकलं जाणार? याकडे सुद्धा लक्ष आहे दुसरीकडे ही जागा पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावी यासाठी सुद्धा शरद पवार गटाकडून गळ घालण्यात आली होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर स्पर्श नकार देताना काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शक्य नसल्याने सांगत नकार दिला आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा सुद्धा पर्याय मागे एकंदरीत मागे पडला आहे.
उदयनराजे भोसलेंचा जोरदार प्रचार
दुसरीकडे भिवंडीची जागा शरद पवार गटाला गेल्याने सातारमध्ये काही बदल होणार का? याची सुद्धा राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, त्याबाबतही अजूनच कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असं जाहीर करत आपला प्रचारही सुद्धा सुरू केला आहे. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात करताना गाठीभेटी सुद्धा सुरू केल्या आहेत. त्यांच्या गाठीभेटींना सुद्धा चांगला प्रतिसाद लाभत आहे. उदयनराजे यांनी उमेदवारीसाठी चार दिवस दिल्लीत तळ ठोकला होता.
महाविकास आघाडीकडून उदयनराजे यांच्या विरोधात कोण असणार? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. दरम्यान, उदयनराजे यांच्या उमेदवारीची घोषणा औपचारिकता असली तरी अजूनही घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुद्धा भूवया उंचावल्या गेल्या आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा उमेदवार कोण असणार यासाठी वाट पाहिली जात आहे का? याचीही चर्चा आहे.
उद्या घोषणा केली जाणार?
दरम्यान, महाविकास आघाडीची जागावाटप संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद उद्या (9 एप्रिल) मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत पाडव्याचा मुहूर्त साधून सातारा आणि माढाचा उमेदवार घोषित केला जाणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. माढामध्ये रणजित निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण आहे. त्यामुळे भाजपचेच धैर्यशील पाटील तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या