Jayant Patil Meets Prithviraj Chavan : माजी सीएम पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमध्ये बंद खोलीत चर्चा!
दोघांमध्ये काय चर्चा? याबाबत तपशील समोर आला नसला तरी एक तास या बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि सांगली या दोन लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jayant Patil Meets Prithviraj Chavan : हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेला वाद त्याचबरोबर साताऱ्यामध्ये अजूनही शरद पवार गटाकडून जाहीर न करण्यात आलेला उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आज बंद खोली चर्चा झाली. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी कराड येथे ही चर्चा झाली.
सातारा-सांगली या दोन लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर चर्चा?
या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट नकार दिला. नंतर बोलू अशी मोजकीच प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा? याबाबत तपशील समोर आला नसला तरी एक तास या बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि सांगली या दोन लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.
सातारा लोकसभेला विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळेकोण निवडणूक लढवणार याची सुद्धा चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी उमेदवारीचा पत्ता उघडला नसला तरी, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे आणि सत्यजित पाटणकर आणि स्वतः श्रीनिवास पाटील या चार नावांची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते.
पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही चर्चेत
त्यामुळे सातारच्या उमेदवारीवर एक दोन दिवसात निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे जयंत पाटील आणि पृथ्वीवर चव्हाण यांची झालेली चर्चा फार महत्त्वाची मानण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही सातारा लोकसभेसाठी चर्चेत आहे. त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली आहे का? अशी शक्यता नाकारता येत नाही.
सांगलीमध्ये वाद थांबेना
सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसची नाराजी उफाळून आली आहे. याठिकाणी विशाल पाटील काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसची नाराजी पार दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळण्यासाठी दिल्लीपर्यंत धडक दिली. मात्र, त्यांना अजूनही त्यामध्ये फारसं यश आलेलं नाही.
सांगलीच्या जागेवरून काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावल्याने राज्यातील नेते सुद्धा ठाकरेंवर नाराज असल्याचे समजते. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. मात्र, संजय राऊत यांनी तो आदेश झुगारून लावला आहे. एका जागेसाठी राज्यातील इतर जागा अडचणीत आणणार आहात का? असा प्रतिप्रश्न केला आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून एक प्रकारे काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये चांगलेच घमासन सुरू आहे.
हातकणंगले तिरंगी लढत होणार
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा बरीच चर्चा सुरु आहे. जागावाटपामध्ये ठाकरे गटाकडे ही जागा आली आहे. मात्र, याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी रिंगणात आहेत. त्यांना ही जागा सोडण्यासाठी ठाकरे प्रयत्नशील असले, तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शेट्टींना पाठिंबा घेण्यासाठी बोलणी सुरू आहेत. तथापि, राजू शेट्टी यांनी बाहेरून पाठिंबा मिळावा अशी मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार नसल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी हातकलंगलेमध्ये उमेदवार देणार का? याची सुद्धा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असून सत्यजित पाटील सरुडकर, सुजित मिणचेकर यांनी सुद्धा तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी निवडणूक होणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या