Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Sangli Loksabha : जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधात ज्या पद्धतीने बोलायला हवेत, ज्या पद्धतीने आक्रमक व्हायला हवेत त्या पद्धतीने कुठेही बोलताना दिसत नाहीत, हे ठळकपणे दिसून आलं आहे.
सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबद्दल चांगलाच खल सुरु आहे. सांगलीच्या जागेवरून तर काँग्रेस मधील आणि ठाकरे गटामधील वाद विकोपाला गेला आहे. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करून एक प्रकारे काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेसने या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विशाल पाटील यांना रिंगणात उतरवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी थेट दिल्लीपर्यंत धाव घेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावली आहे. मात्र, यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
त्यामुळे सांगलीमध्ये उमेदवारीवरून घमासान रंगलं आहे. या वादामध्ये आता लाभ नेमका कोणाचा होणार? याची सुद्धा चर्चा सांगलीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपकडून या ठिकाणी तिसऱ्यांदा संजय पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र, संजय पाटील यांच्या विरोधात असणारी नाराजी ही महाविकास आघाडीला घेरता येणार का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरूनच चर्चा रंगल्याने आता संजय पाटील यांचा मार्ग सुकर होत तर नाही ना? अशी सुद्धा चर्चा आहे.
दरम्यान या सर्व वादामागे नेमका सुत्रधार कोण? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. सांगलीच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांचे स्थान नेहमी सर्वोच्च राहिलं आहे. त्यांना जिल्ह्याचे नेते म्हणूनच पाहिले जाते. असं असताना महाविकास आघाडीमधील एक प्रमुख नेता म्हणून त्यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असताना जयंत पाटील शांत असल्याने कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत आहे? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जयंत पाटलांचा विरोध नेमका कोणासाठी?
जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधात ज्या पद्धतीने बोलायला हवेत, ज्या पद्धतीने आक्रमक व्हायला हवेत त्या पद्धतीने कुठेही बोलताना दिसत नाहीत, हे ठळकपणे दिसून आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपविरोधात रान उठवण्यासाठी आक्रमक पवित्रा दिसून यायला हवा होता. मात्र, तसे कुठेही दिसून येत नाही. दुसरीकडे विश्वजित कदम हे विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी बोलत असले, तरी पण जयंत पाटलांचा तोंडून न येणारा शब्द हा सुद्धा नक्कीच कळीचा मुद्दा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एबीपी माझाने राजकीय विश्लेषक हणमंत मोहिते यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जयंत पाटलांची भूमिका सुसंगत भक्कम विरोध करणारी नसल्याचे मत मांडले. संभाजी पवार, मारूती माने सुद्धा शिवसेनेत होते, पण त्यांनी शिवसेना सोडली. हिंदकेसरी असूनही मारुती माने निवडणूक जिंकले नव्हते, याकडेही मोहिते यांनी लक्ष वेधले.
उद्धव ठाकरेंनी मुद्दा प्रतिष्ठेचा करायला नको होता
हणमंत मोहिते म्हणाले की, सांगलीमध्ये शिवसेनेची कोणत्याही प्रकारची ताकद नसून केडर सुद्धा प्रचंड दुबळं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यासारखी काय आवश्यकता नव्हती. चंद्रहार पाटील यांनी दहा दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी वंचित आणि भाजपकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती. ते 10 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. दहा वर्षांपूर्वी त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा दहा मतांनी फक्त निवडून आले होते. ते कट्टर शिवसेनेत नाहीत. तुलनेत मागील दोनवेळा पराभवाचा अपवाद सोडल्यास वसंतददा पाटील घराण्याकडे 1980 पासून सांगलीची जागा आहे.
चंद्रहार पाटील मातोश्रीवर कसे पोहोचले?
ते म्हणाले की, सांगली मतदारसंघात चार स्थानिक आमदार महाविकास आघाडीचे आहेत. यामध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सुमनताई पाटील आमदार असल्या तरी त्या वसंतदादा घराण्याला मानणाऱ्या आहेत. अरुण लाड सुद्धा वसंतदादा पाटील घराण्यातील नातेवाईक आहेत. चंद्रहार पाटील यापूर्वी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असेही मोहिते यांनी सांगितले. चंद्रहार पाटील जिल्हा परिषदेला सदस्य असताना त्यांचे नेते जयंत पाटील होते. जयंत पाटील आण उद्धव ठाकरे एकमेकांचे बालमोहनमध्ये वर्गमित्र होते. अनिल बाबर आमदार असताना आणि विश्वजित कदम मंत्री असताना जो सहज त्यांना प्रवेश मिळत नव्हता अशी त्यांची तक्रार खासगीत होती. अशा स्थितीत इतक्या वेगाने चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश आणि त्यांना उमेदवारी कशी मिळाली याची सुद्धा चर्चा सांगली असल्याचे ते म्हणतात. वसंतदादा पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या घराण्यातील वाद सर्वांना माहीत असल्याचे ते म्हणाले.
भाजपला सांगलीत जयंत जनता पार्टी का म्हणायचे?
ते पुढे म्हणाले की, सांगलीमध्ये भाजपला जयंत पाटील जनता पार्टी असं म्हटलं जातं होतं. पहिल्यापासून जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून जयंत पाटील महाविकास आघाडीच्या बैठकीत का बोलले नाहीत? असा विषय असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच झारीतले शुक्राचार्य कोण असल्याचे विचारणा विश्वजित कदम आणि विशाल पाटलांकडून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजू शेट्टी म्हणतात, राष्ट्रवादीतील भाजपप्रेमी कोण?
विशेष म्हणजे हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांनी टीकेचा बाण अप्रत्यक्ष जयंत पाटलांवर सोडला होता. राष्ट्रवादीतील भाजपप्रेमी कोण आहे हे माहीत असल्याचे सांगत त्यांनी जयंत पाटलांना टोला लगावला होता. जयंत पाटील भाजपविरोधात आक्रमक होताना दिसत नसल्याचेही मोहिते सांगतात. बोलणं सुद्धा गुळमुळीत असल्याने अंतर्गत विरोध मदत करता का? अशी विचारणा होत असल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी यांनी मुलासाठी सांगलीमध्ये सर्व्हे केला होता, असेही ते म्हणाले.
जयंत पाटील ईडीच्या रडारवर
जयंत पाटील यांचे बंधू, मेहुणे तसेच भाच्याला ईडीकडून नोटीस असल्याचे मोहिते यांनी सांगितले. डीएचएफल प्रकरणात जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या भावाची साखर निर्यात प्रकरणात चौकशी झाली आहे. प्राजक्त तनपुरे यांनाही नोटीस आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील आक्रमक होत नाहीत का? असाही सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.
वादात कोणाला लाभ होणार?
महाविकास आघाडीमध्ये वाद लागल्यास याचा सर्वाधिक लाभ भाजपच्या संजय पाटील यांना होणार असून त्यासाठीच ही रचना केली गेल्याचे हणमंत मोहिते म्हणाले. संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून विलास जगताप, पृथ्वीराज देशमुख बैठकीला येत नाहीत. सेटींगची उमेदवारी म्हणून आरोप होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली असावी अशीही शक्यता असल्याचे मोहिते यांनी नमूद केले. यासाठी विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख मदत करतील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय उद्धव ठाकरे ताकद लावणार नाहीत, असेही ते म्हणाले.