Ramdas Athawale on Sharad Pawar : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं; मंत्री रामदास आठवलेंकडून थेट निमंत्रण
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षांना एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएचे सत्ता येणार आहे.
Ramdas Athawale on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता एनडीएसोबत यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे, असे ते म्हणाले. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून मोदींकडून पवारांचे अनेकवेळा कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. रामदास आठवले सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षांना एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार आहे.
राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत
आठवले यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. राहुल यांच्यावरील कारवाईमध्ये भाजपचा संबंध नाही. राहुल गांधींनी याआधी अनेक वेळा चुकीचे वक्तव्य केली आहेत. एकदा त्यांना माफी देखील मागावी लागली आहे. त्यामुळे त्यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. मोदींवर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट
मनसे नेते राज ठाकरे यांचावरही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. राज ठाकरे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. मुंबईचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस विकास करत असताना त्याला डान्सबार म्हणणं चुकीचं आहे. राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये, भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे, भोंग्याना विरोध करू नये आणि राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, असा टोला देखील लगावला.
लोकसभेसाठी आरपीआयला दोन जागा मिळाव्यात
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा मिळाव्यात अशी आपली मागणी राहणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा देखील करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल. शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेले, पण बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या