Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : घरफोड्या संपत्ती चोरुन, त्यावर नागोबासारखा बसतो; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : देवेद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो या वक्तव्याची बातमी दाखवत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
सांगली : दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा, दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घरं फोडून मी श्रीमंत झालो. अरे दुसऱ्याचे पैसे चोरतोस, दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस, तू कसला रे मर्द? तू कसला राजकारणी? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. देवेद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो या वक्तव्याची बातमी दाखवत ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी जागेवरून मीठाचा खडा पडला असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे लक्ष होते. मात्र, चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर करत काँग्रेसचा विरोध मोडून काढला आहे.
चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर ते म्हणाले की, आज सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. चंद्रहार तू काळजी करू नको. चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायलाच मी इथं आलो आहे. त्याची जबाबदारी आता तुम्ही घ्या, असे आवाहन त्यांनी सांगलीकरांना केले.
रुग्णाला जिवंत असेल तोपर्यंत औषधांची गरज असते
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावरून राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, नुकतंच न्यायव्यवस्थेनं यांना झाडलं आहे. मी न्याय व्यवस्थेला विनंती करतो की जो न्याय द्यायचा आहे तो लवकर द्या. रुग्णाला जिवंत असेल तोपर्यंत औषधांची गरज असते. नार्वेकरने आमची सेना चोरांच्या हातात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे आमचे चिन्ह वापरताना नियम लावा.
तोडा फोडा आणि राज्य करा हे आमचं हिंदुत्व नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या धर्माचा अनादर करणं शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही. ते जे म्हणतात ते हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे, तर भाजपचे हिंदुत्व घरं पेटवणारं आहे.
जय शाहाला अस काय सोनं लागलंय?
घराणेशाहीवर भाजपकडून होणाऱ्या टीकेवरून ठाकरे यांनी अमित शाहांवर तोफ डागली. त्यांनी सांगितले की, आम्ही तुमच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर बोललो नाही, पण आज तुमच्याकडे दुसरे मुद्दे राहिले नाहीत म्हणून माझ्या कुटुंबावर बोलता. तुमच्या संकट काळात ज्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं त्या सेनेसोबत अस वागता, आमच्या घराणेशाही बद्दल बोलता तुमच्याकडे आलेल्या गद्दारामध्ये बाप मंत्री मुलगा खासदार आहे हे चालत का? अशी विचारणा त्यांनी केली.
माझ्या पुत्र प्रेमामुळे पक्ष फुटला म्हणता, पण तुमच्या पुत्र प्रेमामुळे टीम इंडिया फायनल हरली त्याच काय? जय शाहाला अस काय सोनं लागलंय? त्याला बॅट तरी धरता येते का? शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता हे सुरतवाले महाराष्ट्र लुटत आहेत. घटनाबाह्य मिंदे तू आता शिवसैनिक नाहीस, नमो सैनिक झाला आहेस अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या