Sangli Urban Bank : राज्यभर विस्तारलेल्या सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गाडगीळ गटाचा डंका
सांगली अर्बन बँकेच्या (Sangli Urban Bank) निवडणूकीत सत्ताधारी आण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक विद्यमान अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली.
Sangli Urban Bank : सांगली अर्बन बँकेच्या निवडणूकीत सत्ताधारी आण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे. ही निवडणूक सांगली अर्बन सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली. सत्ताधारी गटाकडून विरोधी गटातील बापूसाहेब पुजारी पॅनेलचा सुमारे 7 हजार मतांनी धुव्वा उडवत बँकेवरील वर्चस्व कायम राखलं आहे.
सांगली अर्बन बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. गाडगीळ पॅनेलचे डॉ. रवींद्र आरळी यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. रविवारी १६ जागांसाठी ९१ केंद्रांवर १२ हजार ७५८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष गणेश गाडगीळ व माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी यांच्या गटात लढत झाली. आरोप प्रत्यारोपांमुळे बँकेची निवडणूक चर्चेत आली होती, पण सभासदांनी विद्यमान सत्ताधारी गटाच्या बाजूनेच कौल दिल्याचे मतमोजणी नंतर स्पष्ट झाले.
मोजणीदरम्यान ४२६ मते अवैध ठरली. पहिल्या फेरीपासूनच गाडगीळ पॅनेलने मतमोजणीमध्ये आघाडी घेतली होती. पहिल्याच फेरीत या पॅनेलला साडेतीन हजार तर पुजारी पॅनेलला पाचशे मते मिळाली. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही गाडगीळ पॅनेलने आघाडी कायम राखत साडेसहा ते सात हजार मतांच्या फरकाने पुजारी पॅनेलवर एकतर्फी विजय मिळविला.या विजयानंतर सत्ताधारी गणेश गाडगीळ समर्थक कार्यकर्त्यानी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
प्रगती पॅनेलची मते
गणेश गाडगीळ 9813
- रणजित चव्हाण 9654
- संजय धामणगावकर 9545
- रघुनाथ कालिदास 9537
- श्रीपाद खरे 9426
- सतीश मालू 9604
- अनंत मानवी 9551
- हणमंत पाटील 9652
- संजय पाटील 9595
- शैलेंद्र तेलंग 9513
- श्रीकांत देशपांडे 10939
- स्वाती करंदीकर 9375
- अश्विनी आठवले 9967
- मनोज कोरडे 10128
- रवींद्र भाकरे 20085
- सागर घोंगडे 10994
राज्यभर बँकेच्या 35 शाखा, मराठवाड्यात सर्वांधिक शाखा
59 हजार सभासद असलेल्या या बँकेचे 33 टक्के सभासद सांगली-मिरज शहरात, 33 टक्के जिल्हाभर आणि उर्वरित 34 टक्के सभासद अन्य जिल्ह्यात प्रामुख्याने मराठवाडयात आहेत. बँकेच्या 35 शाखा असून सांगलीसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उदगिरी, कुर्डुवाडी, बार्शी, माजलगाव,परतूर, उडोदरा, वसमत, मानवत आदी ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.