Sangli Crime : शिकाऱ्याची झाली शिकार ! ज्या व्यक्तीची गाडी चोरली त्याच्याच गावात घेऊन गेले आणि सापडले
शिकारी खुद यहाँ शिकार हो गया' याचा प्रत्यय आटपाडी तालुक्यातील एका गाडी चोरीच्या लागलेल्या छड्यावरुन आला. चोरट्यांनी ज्या व्यक्तीची गाडी चोरली होती, त्याच व्यक्तीच्या गावात गेले आणि गळाला लागले.
Sangli Crime : 'शिकारी खुद यहाँ शिकार हो गया' याचा प्रत्यय आटपाडी तालुक्यातील एका गाडी चोरीच्या लागलेल्या छड्यावरुन आला. चोरट्यांनी ज्या व्यक्तीची गाडी चोरली होती, त्याच व्यक्तीच्या गावातील आपल्या पाहुण्यांकडे हे चोरटे तीच चोरीची गाडी 15 दिवसांनी घेऊन गेले. गावातील चाणाक्ष नागरिकांनी ओळखल्यानंतर पोलिसांनी या चोराच्या मुसक्या आवळल्या.
आपण जात असलेल्या पाहुण्यांच्या गावातील दुचाकी असल्याची कसलीही कल्पना दोघा चोरट्यांना नसल्याने ज्या गावातील गाडी चोरली त्याच गावात ते गाडी घेऊन गेल्याने व पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने 'शिकारी खुद यहाँ शिकार हो गया' अशी चर्चा रंगली.
पंधरा दिवसांपूर्वी बाबासाहेब गणपत काटे (वय ६३, रा. पिंपरी खुर्द) हे सेवानिवृत्त जवान पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त दुचाकी (क्र. एमएच १०, यु ६५६२) वरून आटपाडी बसस्थानकात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याबाबत त्यांनी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद केला होता. मात्र गाडी चोरीचा छडा लागला नव्हता. मात्र ज्या चोरट्यांनी जी दुचाकी चोरली होती त्याच दुचाकीवरून आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात पाहुण्यांकडे आले होते.
गाडी गावात घेऊन आले आणि अडकले
15 दिवसांपूर्वी आपण आटपाडी बस स्थानकातून आपण ही चोरलेली दुचाकी याच गावातील व्यक्तीची आहे हे त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे चोरटे गावात येताच काही नागरिकांनी ती गाडी पाहिली. या गाडीवर विशिष्ट रंगाने काही मजकुर व चित्र काढल्याने गाडी लगेच ओळखली जात होती. गावातील काही लोकांनी जवान काटे यांना त्यांची गाडी गावात कुणीतरी घेऊन आल्याचे सांगितले..त्यानंतर काटे त्याठिकाणी आले आणि त्यांनी चोरट्यांकडे गाडी कोणाची? अशी चौकशी केल्यानंतर ते गोंधळले.
त्यातील एकाने जवळच्या डाळिंब बागेत पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर एक दुसऱ्या साथीदाराला याची काहीच कल्पना नसल्याने तो नागरिकांच्या तावडीत सापडला. जमलेल्या नागरिकांनी आटपाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यावेळी पिंपरी खुर्द येथे पोलिसांनी धाव घेत डाळिंब बागेत लपून बसलेल्या चोरास पकडले. चौकशीत दुचाकी चोरणारे बिरा अर्जुन मोरे (वय 30), गणेश किसन मोरे (वय 30) दोघेही रा. सोनलवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील रहिवासी असल्याचे समजले.
चोरांकडून गुन्ह्याची कबूली
दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीची गाडी चोरली होती त्याच व्यक्तीच्या गावातील आपल्या पाहुण्यांकडे तीच चोरीची गाडी घेऊन जाण्याने चोर अलगद मालकाच्या आणि नंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस कॉन्स्टेबल पुकळे, पोलीस नाईक दिग्विजय कराळे, नितीन मोरे, प्रमोद रोडे, संभाजी सोनवणे यांनी ही कारवाई केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या