Sangli : म्हैसाळ प्रकरणातील सावकारकीच्या गुन्ह्याखाली अटकेतील तीन शिक्षक निलंबित, खातेनिहाय चौकशी होणार
Sangli News Updates: म्हैसाळमधील नऊ जणांच्या मृत्यूप्रकरणी सावकारीच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या तीन शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाई करत त्याचे निलंबन केले आहे.
Sangli News Updates: मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील नऊ जणांच्या मृत्यूप्रकरणी सावकारीच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या तीन शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाई करत त्याचे निलंबन केले आहे. शिक्षक अनिल बोराडे, शामगोंडा पाटील, शुभदा कांबळे असे या तिघांची नावे आहेत. यामध्ये शामगोंडा पाटील हे शिक्षक बँकेचे नूतन संचालक आहे. या सर्व शिक्षकांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
म्हैसाळमधील नऊ जणांनी सुरुवातीला सामूहिक आत्महत्या केल्याचे दिसून आल्याने याप्रकरणी पोलिसांनी म्हैसाळ येथील 25 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या नऊ जणांची आत्महत्या नसून हत्याकांड झाल्याचे समोर आले होते. दोघा मांत्रिकांनी हत्याकांड झाल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यान, सावकारी प्रकरणात अटक केलेल्या 13 जणांमध्ये विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
पोलिसांच्या अहवालानुसार शिक्षक अनिल बोराडे, शामगोंडा पाटील, शुभदा कांबळे यांना अटक असून दोन दिवसापेक्षा जास्त पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामध्ये प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये नव्याने निवडून आलेल्या संचालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी या तीनही शिक्षकांना निलंबित केले आहे. संबधित शिक्षकांना पलूस पंचायत समिती येथे हजेरी लावण्यासाठी मुख्यालय दिले आहे.
निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी शिक्षक बँकेचा संचालक निलंबित
म्हैसाळ प्रकरणात अटकेत असलेला शिक्षक शामगोंडा पाटील मंगळवारी शिक्षक बँकेच्या निवडणुकीत विजयी झाला होता. कोठडीत असतानाही त्याच्या समर्थकांनी जल्लोष केला. तसेच बँकेचे संचालक झालेल्या पाटील याला दुसऱ्याच दिवशी प्रशासनाच्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
संबंधित बातम्या