तीन महिन्यापूर्वी विट्यात आले, आता दोन लाखांची लाच घेताना जाळ्यात सापडले, मुख्याधिकारी विनायक औधकर ACBच्या ताब्यात
Sangli Bribe News : विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
सांगली: विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी (Sangli Vita Municipality CEO) विनायक औंधकर (Vinayak Aundhkar) लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) जाळ्यात सापडलेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विनायक औंधकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्याधिकारी विनायक औधकर यांनी बांधकाम ठेकेदाराकडून इमारत बांधकाम परवानगीसाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील दोन लाखांची लाच घेताना विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर याना रंगेहात पकडण्यात आलं आहे.
तीन महिन्यांपूर्वीच विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी औधकर यांची नियुक्ती झाली होती. विटा शहरातील एका ठेकेदाराकडे त्यांनी एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे.
तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून आपल्याकडे लाच मागितली जातेय अशी माहिती दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान तीन महिन्यापूर्वी, 10 मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती.
नाशिकमध्ये 30 लाखांची लाच घेताना अधिकारी अटकेत
नाशिक जिल्ह्यातील लाखो सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह आवश्यक परवानग्या आणि निवडणुका लावणाऱ्या जिल्हा उपनिबंधक सतिष भाऊसाहेब खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. खरे यांनी काॅलेजराेडवरील 'आई' या निवासस्थानी ही लाच स्वीकारली असून त्यांच्या वकिलाला अटक झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर आणि वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी आणि निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा वकील सभद्रा यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. संबंधित लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे आणि त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
ही बातमी वाचा: