Nashik News : नाशिकमध्ये आश्रमशाळा अधीक्षक, तर जळगावमध्ये तलाठीसह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
Nashik News : नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एकाच दिवशीच्या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Nashik News : नाशिकसह जिल्ह्यात आणि विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाया सुरूच आहे. एकाच दिवशीच्या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील एक आश्रमशाळा अधिक्षक तर जळगावच्या (Jalgaon) रावेर तालुक्यात तलाठी आणि कोतवाल यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यासह विभागात लाचखोरीच्या (Bribe Case) घटना नित्याच्या झाल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेला (Government Ashram School) पाण्याच्या टँकरच्या ट्रीपसाठी आदेश काढून देण्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच स्वीकारताना आश्रमशाळेच्या अधीक्षकाला अटक करण्यात आली. विवेक मधुकर शिंदे असे लाचखोर अधीक्षकाचे नाव असून, हरसूल पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील एका 32 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, लाचखोर शिंदे हा मुरंबी आश्रमशाळेचा अधीक्षक आहे. शिंदे याने आश्रमशाळेला पाणीपुरवठ्यासंदर्भात आदिवासी विकास भवन इथून तक्रारदाराच्या नावे आदेश काढून देण्याच्या मोबदल्यात गेल्या 22 फेब्रुवारी रोजी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पथकाने यासंदर्भात पडताळणी केली. यामध्ये लाचखोर शिंदे याने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
लाचखोर अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी येथील आदिवासी आश्रमशाळेचा लाचखोर अधिक्षक विवेक मधुकर शिंदे एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. लाचखोर शिंदे याने आश्रमशाळेवर टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून 20 हजार रुपयांची लाच मागितली. आदिवासी विकास विभागाकडून या ठेकेदाराला पाणी पुरवठ्याची परवानगी मिळाली होती. हे आदेश काढून देणे आणि टँकरची ट्रीप अॅडजेस्ट करुन देण्यासाठी लाचखोर शिंदे याने 20 हजाराची मागणी केली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. याप्रकरणी शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
तलाठी आणि कोतवाल यांच्यावरील कारवाई
नाशिकनंतर विभागात जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात लाचखोरीच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे आणि कोतवाल शांताराम यादव कोळी अशी लाचखोरांची नावे आहेत. त्यांनी 4 हजार रुपयांची लाच मागितली होती. एका शेतकऱ्याची वडिलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. मोठे भाऊ मयत झालेले असल्याने संबंधित शेत जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर मयत भावाची पत्नी आणि मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घ्यायचे होते. त्याच्या मोबदल्याततलाठी न्हायदे आणि कोतवाल कोळी यांनी 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्याची दखल घेत एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि त्यात न्हायदे व कोळी हे रंगेहाथ सापडले. तलाठी कार्यालयात या दोघांनी लाच स्विकारली.