Sangli Rain : सांगलीत एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 10 फूट वाढ; आजही मुसळधार पावसाची शक्यता, पुन्हा पुराचा धोका वाढणार?
Sangli Rain : सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 10 फुटाने वाढ होऊन नदीतील पाण्याची पातळी 18 फुटांवर पोहचली आहे.
Sangli Rain : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी, नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत. तर सांगलीतील कृष्णा नदीच्या(Krishna River) पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 10 फुटाने वाढ होऊन नदीतील पाण्याची पातळी 18 फुटांवर पोहचली आहे. तर दुसरीकडे चांदोली धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी देखील पात्राबाहेर पडली आहे. सांगली शहर परिसरात काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची(Krishna River) पाणी पातळी वाढली आहे.
राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा(Rain) जोर वाढायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला महापुर येणार का याबाबत चिंता पुन्हा एकदा वाढू लागली आहे.
कोयाना धरण परिसरात गेल्या 24 तासात 274 मिलिमिटर पावसाची नोंद
कोयना धरणातील पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. कोयना धरणातील(Koyna Dam) पाणी साठ्यात गेल्या 24 तासात 4 टीएमसीने पाणी वाढलं आहे. धराणात प्रतिसेकंदाला 48 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. 105 टीएमसीच्या कोयना धरणात(Koyna Dam) 40.43 टीएमसी पाणी साठा वाढला आहे. पावासामुळे अनेक छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे परिसरातील जुना संगमनगर पुलही पाण्याखाली गेला आहे.
राज्याच्या या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाची(Heavy Rain) शक्यता आहे. हवामान विभागाकडून आज रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय काही भागांत मध्यम तर, काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाने(Heavy Rain) हजेरी लावली आहे. पुणे, सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भाागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या वतीनं मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 48 तासांसाठी हवामान विभागानं शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत कमाल आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
रेड अलर्ट : रत्नागिरी, रायगड
ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा
यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, पालघर