Sangli Rain Update: वारणा नदी पात्राबाहेर, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी; शिराळा तालुक्यात मांगले, सावर्डे पूल पाण्यात
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून केव्हाही विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.
Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) शिराळा तालुक्यातील चांदोली धरण व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने वारणा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. शिराळा तालुक्यातील मांगले, सावर्डे वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वारणा नदी काठच्या गावांना वारणा धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून केव्हाही विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी हलवावीत. कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढ्यात प्रवेश करु नये आणि पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चरण, वारणावतीमध्ये अतिवृष्टीची नोंद
दरम्यान, शिराळा तालुक्यातील चरण, वारणावतीमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील जत, आटपाडी तालुक्यात अजूनही तुरळक पाऊस आहे. सांगली, मिरजमध्येही पावसाची नोंद झाली.
कोकनेवाडी आणि मिरुखेवाडी गावांतील वाड्यावर दरड कोसळण्याचा धोका
दरम्यान, शिराळा तालुक्यातील कोकनेवाडी आणि मिरुखेवाडी ही वाडीवस्ती डोंगराच्या मध्यभागी आहे. पाऊस हा डोंगर माथ्यातून या वस्ती पाणी येते. शिवाय सततच्या पावसामुळे येथील घरामध्ये पाणी पाझरू लागले आहे. तर काही ठिकाणी घरांना ओलावा देखील धरला आहे. त्यामुळे या भागात कधीही भूस्खलन होण्याची शक्यता आहे. दरड कोसळण्याची टांगती तलवार या भागातील लोकांवर असून वेळीच शासनाने योग्य त्या खबरदारी घेऊन कायमस्वरूपीची पाऊलं उचलली नाही तर दरड कोसळण्यच्या घटनांची इथेही पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
शासनाने कायमस्वरूपी स्थलांतरचा निर्णय घ्यावा अशी मागणी या डोंगर भागात वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांमधून मागणी होत आहे. तसेच या भागात बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागात ठोस उपायोजना राबवण्याऐवजी किरकोळ उपायोजना केल्या जात आहे, त्यामुळे नागरिकांनी यावर देखील संताप व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या