Sangli News: बेडगमधील 'त्या' कमानीचा वाद चिघळण्याच्या मार्गावर; ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्याने बेमुदत गाव बंद आंदोलनाचा पवित्रा
Sangli News : सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून गावाची बदनामी थांबवून संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा बेडग ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमधील डॉ. आंबेडकर कमानीचा वाद आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहे. कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर गावातील आंबेडकरी समाजाने गाव सोडून लाँग मार्च सुरू केला. यानंतर राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची आदेश दिले आहेत. त्यानुसार सरपंच, उपसरपंचासह तिघांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, या विरोधात बेडग ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत.
बेडगमधील 'त्या' कमानीचा वाद चिघळण्याच्या मार्गावर
गावात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नाही, कायदेशीररीत्या अतिक्रमण असलेले बांधकाम पाडण्यात आले, पण गावची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न बाहेरच्या व्यक्तींकडून सुरू असल्याचा आरोप करत, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून गावाची बदनामी थांबवून संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा बेडग ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
सरकारी खर्चात बेडगची स्वागत कमान बांधू
बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारली जात असलेल्या स्वागत कमानीचे खांब ग्रामपंचायतने पाडल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर गाव सोडून मुंबईकडे प्रस्थान केलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. सरकारी खर्चातून कमान बांधून देऊ तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना दिले. त्यानुसार सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.
समाज माध्यमांवर अफवा पसरवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
दरम्यान, बेडग गावातील स्वागत कमान संदर्भात समाज माध्यमांवर कोणत्याही अफवा पसरवू नका. बेडगच्या ग्रामस्थांनी गावात सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितलं की, या घटनेमुळे गावात कोणताही भेदभाव होऊ नये, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. सर्वांनी गावाच्या विकासासाठी पुन्हा एकत्र येणे अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी आपापसात सुसंवाद ठेवून कृती करावी. प्रशासनामार्फत सर्वांना सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले. बेडग गावातील स्वागत कमानीच्या अनुषंगाने समाज माध्यमावर कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये. तसेच, दोन समाज बांधवांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, याची खबरदारी गावकऱ्यांनी घ्यावी. या संदर्भात समाज माध्यमातून चुकीचे संदेश देणाऱ्यांवर आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या