Sangli Rain Update: चांदोली धरणातून 2465 क्युसेकने वारणा नदीपात्रात विसर्ग सुरू; कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर स्थिर
धरणातून विसर्ग सुरु करण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोलीमध्ये गेल्या 24 तासांत 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) शिराळा तालुक्यातील चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात 27.86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आज (26 जुलै) धरणातून 2456 क्युसेकने वारणा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून विसर्ग सुरु करण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, चांदोलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चालू वर्षात आतापर्यंत 1 हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे. धरणात 15 हजार 926 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर स्थिर
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर स्थिर आहे. सांगली जिल्ह्यात पावसाने विश्राती घेतली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान, सांगलीमधील 2021मधील महापुराचा अनुभव लक्षात घेत मनपाकडून पुरबाधित होणाऱ्या कुटुंबाना नोटिस बजावल्या आहेत. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता गृहित धरून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु आहे.
ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट
दुसरीकडे, शिराळा तालुक्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या कोकनेवाडी आणि मिरुखेवाडी गावांमधील वाड्यावर NDRF ची एक टीम दाखल झाली आहे. काल (25 जुलै) या भागातील लोकांची व्यथा, परिस्थिती एबीपी माझाने दाखवली होती. या गावातील वाड्या-वस्त्यावरील ग्रामस्थांना एनडीआरएफचे जवान आपत्कालीन प्रशिक्षण देणार आहेत. या भागातील डोंगराची सुद्धा पाहणी करणार आहेत. चांदोली धरण परिसरात असलेल्या या भागात सातत्याने अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या भागाला देखील भूस्खलनाचा धोका वाढला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या