मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
Bhimashankar Temple Closed : भिमाशंकर मंदिर हे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

पुणे : जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा (Bhimashankar Temple) विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) कालावधीमध्ये मात्र आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.
Bhimashankar Temple News : संयुक्त बैठकीत सर्वानुमते निर्णय
जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत 23 डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मंदिर 9 जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 हा महाशिवरात्रीचा कालावधी वगळता मंदिर दर्शनासाठी बंद राहील. महाशिवरात्री दरम्यान मात्र भाविकांसाठी मंदिर खुले राहणार आहे. या संबंधित माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
Simhastha Kumbh Preparation : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी
सन 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) होणार असून, त्याआधी लाखो भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Bhimashankar Temple Rituals : नित्य पूजा सुरूच, मात्र थेट दर्शन बंद
मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना थेट दर्शन (Direct Darshan) किंवा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
Bhimashankar Temple Restrictions : प्रवेशावर कडक निर्बंध
बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थ वगळता अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Pune Collector Appeal : जिल्हाधिकाऱ्यांचे भावनिक आवाहन
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केलं.
ही बातमी वाचा:






















