Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
BMC Election: नवाब मलिक यांच्या नेतृत्वात जर निवडणूक लढवण्यात जात असतील तर आम्ही सोबत जाणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादीने सुद्धा भूमिका ठाम ठेवली आहे.

Nawab Malik: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र, नवाब मलिक यांना जबाबदारी देण्यात आल्याने भाजपकडून नाराजीचा सूर आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वात जर निवडणूक लढवण्यात जात असतील तर आम्ही सोबत जाणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादीने सुद्धा भूमिका ठाम ठेवत नवाब मलिक यांच्याकडेच मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिली आहे.
मलिक यांच्या कुटुंबात किती जणांना उमेदवारी?
नवाब मलिक यांच्या कुटुंबात किती जणांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिक कुटुंबात तीन जणांना उमेदवारी दिली जाणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू सुद्धा आहेत. तसेच बहीणीचा सुद्धा समावेश आहे. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे. नवाब मलिक यांच्या बहिण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी दिली जाणार आहे. कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत. कप्तान मलिक यांचा प्रभाग 168 होता तो आता सध्या महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे कप्तान मलिक यांनी नवीन 165 नंबर प्रभागामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष; स्टार प्रचारकांची रणनीती
मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष केंद्रीत करत भाजप आणि महायुतीने स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर, खासदार व अभिनेता मनोज तिवारी, तसेच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील निरुहुआ आणि रवी किशन यांना प्रचारात सहभागी केलं जाणार आहे. उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त असलेल्या वॉर्डांमध्ये हे नेते आणि कलाकार प्रचाराच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. दुसरीकडे, शिवसेनेकडूनही प्रचारासाठी खास तयारी करण्यात आली असून, पक्षाचे नेते आणि अभिनेते गोविंदा यांना निवडणूक प्रचारात सक्रियपणे उतरवण्याची योजना आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये स्टार प्रचारकांच्या जंगी प्रचार सभांचा माहोल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















