Sangli News : जतमधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते याच महिन्यात होणार अनावरण
Sangli News : फेब्रुवारी 2022 मध्ये जत शहरात दोन गटात मोठा वाद झाला होता. या मुद्यावरून माजी आमदार विलासराव जगताप आणि विद्यमान आमदार विक्रमसिह सावंत यांच्यात वाद झाला होता.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे (statue of Chhatrapati Shivaji maharaj in Jat will be unveiled) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते याच महिन्यात अनावरण होणार आहे. याच पुतळ्यावरून फेब्रुवारी 2022 मध्ये जत शहरात दोन गटात मोठा वाद झाला होता. या मुद्यावरून माजी आमदार विलासराव जगताप आणि विद्यमान आमदार विक्रमसिह सावंत यांच्यात वाद झाला होता. वाद वाढल्याने गेल्या 10 महिन्यांपासून पुतळा शहरात उभारलेल्या चबुतऱ्यावर झाकून ठेवण्यात आला होता. दरम्यान, पुतळा अनावरणाची माहिती जतमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. आष्टा शहरात शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरु होते, अगदी त्याच पद्धतीने जतमधील पुतळ्यावरूनही राजकारण झाले होते.
शिवरायांच्या पुतळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण
शिवरायांच्या पुतळ्यावरून (Chhatrapati Shivaji maharaj) श्रेयवादाचे राजकारण जतमध्ये सुरु झाले होते. जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे या पुतळा समितीचे अध्यक्ष आहेत. दुसरीकडे जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना या पुतळा समितीमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. आमदारांमुळे पुतळा बसवण्यास प्रशासन विनाकारण परवानगी अट घालून आडकाठी करत असल्याचा आरोप जगताप यांनी केला होता.
तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुतळा बसविण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय हा पुतळा चबुतरावर उभा करता येणार नाही, असा निर्णय दिला होता. मात्र, पुतळा समितीने जुन्या ठिकाणीच पुतळा बसविण्यात येणार असून जीर्णोद्धार करत असल्याने परवानगीची आवश्यकता नाही असा दावा केला होता. यामुळे जतमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
जत-सांगली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौकात 1962 साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु 16 वर्षांपूर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतरास तडा गेल्याने हा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकवर्गणीतून नवा अश्वारूढ पुतळा बसविणे व जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते व शिवप्रेमीने घेतला होता. पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा मिरजेतून शनिवारी पोलिसांनी अटकाव करूनही जत शहरात आणला होता.
इतर महत्वाच्या बातम्या