Sangli News : गर्भपात करताना सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू; मृत्यू दाखल्यासाठी मृतदेहांसह चिक्कोडीपासून सांगलीपर्यंत भटकंती
कर्नाटकात महालिंगपूरममध्ये गर्भपात केल्यानंतर मृत्यू झालेल्या महिलेच्या मृतदेहासह सांगलीत फिरणाऱ्या नातेवाइकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गर्भपात केल्यानंतर मृत झालेले अर्भकही कारमध्ये आढळून आले.
सांगली : कर्नाटकातील चिक्कोडीत गर्भवतीचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर गर्भवतीचा मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी नातेवाईक महिला आणि अर्भकाचा मृतदेह मोटारीमध्ये घालून सांगलीत फिरत असताना सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. जयसिंगपुरात या मयत महिलेचे गर्भलिंग निदान करण्यात आले होते. या प्रकरणात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगली पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. यामध्ये जयसिंगपूर आणि सांगलीतील प्रत्येकी एक आणि महालिंगपूरममधील दोन डॉक्टर असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा महालिंगपूरम ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरम येथे गर्भपात केल्यानंतर मृत्यू पावलेल्या महिलेच्या मृतदेहासह सांगलीत फिरणाऱ्या नातेवाइकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गर्भपात केल्यानंतर मृत झालेले अर्भकही मोटारीतच आढळून आले.
विवाहिता सैनिकाची पत्नी, दोन मुली झाल्याने गर्भपात
सोनाली सचिन कदम असे मृत विवाहितेचं नाव आहे. सोनालीचे दुधगाव (ता. मिरज) हे माहेर आहे. दुधगाव येथील सोनालीचा काही वर्षांपूर्वी आळते येथील तरुणाशी विवाह झाला आहे. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. तिला दोन मुली असून, तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे नातेवाईकांनी ठरवले होते.
डॉक्टरांचा मृत्यूचा दाखला देण्यास नकार
चौकशी करून काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे एका रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी केली. तेथील अहवाल मिळताच त्यांनी कर्नाटकातील चिक्कोडी गाठले. चिक्कोडीजवळील महालिंगपूर येथे एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. परंतु, गर्भपातानंतर सोनालीची प्रकृती चिंताजनक बनली आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी सोनालीला अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याची तयारी केली. परंतु, तेथील डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला. सोनालीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरू नये म्हणून तातडीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. परंतु, मृत्यूचा दाखला मिळवायचा कसा? यासाठी तिचा मृतदेह मोटारीत घालून नातेवाईक सांगलीत आले.
गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपुरात
सांगली परिसरात कोणता डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल म्हणून ते सायंकाळी चौकशी करत फिरत होते. कारमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह होता. मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नातेवाइकांसमवेत असणारा अधिकारी हा पदवी घेतलेला आहे की बोगस आहे याची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात करण्यात आली, तेथील एक वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्ष महालिंगपूरम येथे गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी येथे दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्यासाठी महालिंगपूरम येथे रवाना झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या