Sangli Accident News: सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Maharashtra Road Accident: सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
सांगली: सांगलीच्या तासगाव - मणेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये सहाजणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव - मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात (Road Accident) झाला. यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जण जागीच गतप्राण झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.
या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते.
तेथून परतत असताना हा अपघात झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रात्रीची वेळ असल्याने वेळेवर मदत मिळाली नाही जखमी अवस्थेत पहाटेपर्यंत पडून राहिले
या दुर्घटनेबद्दल मनाला वेदना देणारी आणखी माहिती समोर आली आहे. कार वेगात असल्यामुळे जोरात कोरड्या कॅनॉलमध्ये आदळली. यामध्ये कारचे बोनेट आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. त्यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना जबर मार लागला. हा अपघात झाला तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वर्दी देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले.
दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे
मयत नावे
राजेंद्र जगन्नाथ पाटील - वय 60
सुजाता राजेंद्र पाटील -वय 55
प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव)
ध्रुवा- वय 3 वर्ष
कार्तिकी- वय 1 वर्ष
राजवी- वय 2 वर्ष
जखमी
स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष