Krishna River Pollution: कृष्णा नदीत प्रदुषणानं माशांचा तडफडून मृत्यू; दत्त इंडियाचा वीज, पाणीपुरवठा तोडला, महावितरण आणि पाटबंधारेची कारवाई
काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ हजारो मासे मृत झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती.
Krishna River : कृष्णा नदीचे प्रदूषण आणि लाखो माशांच्या मृत्यूला ठरल्याप्रकरणी सांगलीतील (Sangli News) दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाटबंधारे आणि महावितरण कंपनीने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ हजारो मासे मृत झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती.
घटनास्थळी पंचनामा करून त्याबाबतचा एक उपप्रादेशिक अहवालही उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ अवताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठवला होता. त्यानुसार दखल घेत, दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा तोडण्याचे आणि महावितरण कंपनीला वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. गेली चार दिवस कारवाई झाली नव्हती. मात्र, अखेर आता दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान, कृष्णा नदीतील प्रदूषण प्रकरणी महापालिकेस यापूर्वीच फौजदारी कारवाईची नोटीस मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यावर महापालिकेने अद्याप खुलासा केलेला नाही.
राजू शेट्टींकडून याचिका दाखल
दरम्यान, कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (National Green Tribunal) पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी अॅड. असिम सरोदे यांच्या मदतीने 13 मार्च रोजी याचिका दाखल केली आहे. पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही प्रतिवादी केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अॅड. असिम सरोदे यांच्यासह अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी, अॅड. सुघांशी रोपिया न्यायालयीन काम बघत आहेत. अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी हे स्वतः सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना कृष्णा नदीतील प्रदूषणाचा हा जुना विषय पूर्ण माहिती आहे.
येत्या आठवड्यात सुनावणी होणार
दरम्यान, थेट पर्यावरण न्यायालयात याचिका दाखल झाल्याने संबधित अधिकाऱ्यांची जबादारी तसेच कारखान्याची आणि महानगरपालिकेची चिंता वाढली आहे. या पर्यावरणहित याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाच्या (NGT) न्या. डी. के. सिंह आणि डॉ. विजय कुलकर्णी यांच्या समक्ष होणार आहे. पर्यावरणाची हानी, माशांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाच्या बेजबाबदारपणाचा हिशोब होईल, असे अॅड.असिम सरोदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :