Sangli News : कृष्णा नदीत मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात; राजू शेट्टींकडून याचिका दाखल
Maharashtra Sangli News : दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (National Green Tribunal) पोहोचलं आहे.
Sangli News : सांगलीत कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (National Green Tribunal) पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी अॅड. असिम सरोदे (Adv. Asim Sarode) यांच्या मदतीने सोमवारी (13 मार्च 2023) याचिका दाखल केली. पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही प्रतिवादी केला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अॅड. असिम सरोदे यांच्यासह अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी, अॅड. सुघांशी रोपिया न्यायालयीन काम बघत आहेत. अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी हे स्वतः सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना कृष्णा नदीतील प्रदूषणाचा हा जुना विषय पूर्ण माहिती आहे.
दरवेळी फक्त कारणे दाखवा नोटीस काढली जाते
कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळीमिश्रित पाणी विनाप्रक्रिया सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे नदीतील जलचर संकटात आलं आहेत. नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने मासे मृत होत आहेत. प्रक्रिया न करता महानगरपालिकेद्वारे कृष्णा नदीत सांडपाणी सोडलं जाते. कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करत नाही. दरवेळी केवळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते, असा आरोप याचिकाकर्ते राजू शेट्टी यांनी याचिकेतून केला आहे.
साखर कारखान्याला कारवाईपासून अभय का? राजू शेट्टींचा सवाल
नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच पडला होता. मृत मासे झुंडीने काठाला येत असल्याचे दिसून आले. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. लहान माशांपासून आठ-दहा किलो वजनाचे मासे देखील या ठिकाणी आता मृत झाल्याचे आढळून आले. दरम्यान, नदी प्रदूषित होण्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगलीतील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्यातील मळी कृष्णा नदीत सोडल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मेले आहेत. जलचर जीवनाचा नाश झाला, तसेच जैवविविधता नष्ट झाली हे स्पष्ट असतानाही साखर कारखान्याला कारवाई पासून अभय का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
येत्या आठवड्यात सुनावणी होणार
ज्या ठिकाणी मासे मृत झाले आहेत, त्या भागातील पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी घेतले आहेत. पाणी प्रदूषण होण्यामागील निश्चित कारण लवकरच स्पष्ट होईल. अंकली पुलाजवळ काही मृत मासेही मत्स्यविकास मंडळाच्या अधिकार्यांकडून ताब्यात घेण्यात आले असून मासे मृत होण्यामागील कारण या तपासणीतून स्पष्ट होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु, आता थेट पर्यावरण न्यायालयात याचिका दाखल झाल्याने संबधित अधिकाऱ्यांची जबादारी तसेच कारखान्याची आणि महानगरपालिकेची चिंता वाढली आहे. या पर्यावरणहित याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाच्या (NGT) न्या. डी. के. सिंग आणि डॉ. विजय कुलकर्णी यांच्या समक्ष होणार आहे. पर्यावरणाची हानी, माशांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाच्या बेजबाबदारपणाचा हिशोब होईल, असे अॅड.असिम सरोदे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :