Sangli News: 'बेडग'मधील आंबेडकर स्वागत कमानी वाद प्रकरण; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
Sangli News: कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते.
Sangli News: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यातील बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीचे खांब पाडल्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रारदार आणि ग्रामस्थांची बाजू जाणून घेण्यासाठी उद्या (28 जुलै) बैठक घेण्यात येणार आहे.
कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर 15 गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. गुन्हे मागे घ्यावेत, जिल्हा परिषदेने बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, कमानीचे बांधकाम कोठे व कसे करायचे अथवा करायचे नाही, याबाबत मार्गदर्शन करावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवले आहे.
पाच जणांच्या समितीमध्ये कोणाचा समावेश?
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एच. काळे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे व समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांची समिती नियुक्त केली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे.
सरकारी खर्चात बेडगची स्वागत कमान बांधू
गाव सोडून मुंबईकडे प्रस्थान केलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. सरकारी खर्चातून कमान बांधून देऊ तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना दिले होते. त्यानुसार सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले. दुसरीकडे, गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ बेडगसह मिरज तालुक्यातील पूर्व भागातील 15 गावांनी कडकडीत बंद पाळत 24 जुलै रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.
इतर महत्वाच्या बातम्या