Sangli News : मिरज तालुक्यातील बेडगमधील आंबेडकर स्वागत कमान पाडकाम वाद; ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई
Sangli News : बेडगमधील स्वागत कमान बेडग ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर वाद चांगलाच पेटला आहे. यामुळे गावातील दोन आमनेसामने आले आहेत. या प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यातील बेडग गावामधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडकाम प्रकरणात जिल्हा परिषदेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत बेडग गावचे तत्कालिन ग्रामसेवक बी. एल. पाटील आणि विद्यमान नगरसेवक एम. एस. धेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही कारवाई केली आहे. बेडगमधील स्वागत कमान बेडग ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर वाद चांगलाच पेटला आहे. यामुळे गावातील दोन आमनेसामने आले आहेत. या प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पाडकामाचा वाद पेटल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ग्रामपंचाय विभागाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
खुलासा समाधानकारक नसल्याने ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई
लोखंडे तसेच मिरजचे गटविकास अधिकारी यांनी बेडगला भेट देत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली होती. यानंतर पाडकाम सदोष असल्याचे दिसून आले होते. यानंतर गावचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवकांना नोटीस पाठण्यात आली होती. यानंतर नोटीसीवर सात दिवसांनी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, खुलासा समाधानकारक नसल्याने ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, तत्कालिन ग्रामसेवक बी. एल. पाटील यांनी निलंबनाच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या कारणे दाखवा नोटिशीविरोधात दावा दाखल केला आहे.
दरम्यान, कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर 15 गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. गुन्हे मागे घ्यावेत, जिल्हा परिषदेने बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, कमानीचे बांधकाम कोठे आणि कसे करायचे अथवा करायचे नाही, याबाबत मार्गदर्शन करावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवले होते.
यानंतर जिल्हा परिषदेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एच. काळे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे व समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांची समिती नियुक्त केली केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या