Sangli News : जागेपणीच रुग्णाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया; मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची किमया
मेंदूमध्ये झालेली कर्करोगाची गाठ रूग्ण महिलेच्या जागेपणी शस्त्रक्रिया करून काढण्याची किमया मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयातील (Government Medical College, Miraj) डॉक्टरांनी केली.
Sangli News : मेंदूमध्ये निर्माण झालेली कर्करोगाची गाठ रूग्ण महिलेच्या जागेपणी शस्त्रक्रिया करून काढण्याची किमया मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयातील (Government Medical College, Miraj) डॉक्टरांनी केली. शस्त्रक्रियेनंतर महिला रूग्ण पूर्णपणे ठीक असून या यशस्वी कामगिरीबद्दल शासकीय रूग्णालयातील भूलतज्ज्ञ आणि मेंदूविकार तज्ज्ञांसह कर्मचारी पथकाचे कौतुक होत आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयात अशाप्रकारची मेंदूवरील गाठीची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच रुग्ण पूर्णत: जागा असताना स्थानीय भूल देऊन करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी चक्कर येणे व डोकेदुखीचा त्रास असल्याची 40 वर्षीय महिला रुग्णाची तक्रार होती. या तक्रारीवरून कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीमध्ये तिच्या मेंदूमध्ये कर्करोगाची (ग्लिओमा) गाठ असल्याचे आढळून आले. यामुळे मिरजेतील (Miraj) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या Government Medical College, Miraj) शल्यचिकित्सा विभागाकडे उपचारासाठी महिला दाखल झाली. अधिक वैद्यकीय तपासणीमध्ये मेंदूच्या उजव्या बाजूच्या भागात 2.4 बाय 2.8 बाय 3.4 सेंटीमीटरची गाठ असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेने ही गाठ काढण्यासाठी महिला रूग्णालयात दाखल झाली होती.
स्थानिय भूल देत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय
मेंदूला झालेली गाठ काढण्यासाठी पूर्ण भूल दिली, तर मेंदूच्या अन्य भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मेंदू विकार शल्यविशारद आणि भूलतज्ज्ञांनी रूग्णाला जागे ठेवूनच मात्र, स्थानिय भूल देत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यामागचा उद्देश म्हणजे मेंदूच्या चांगल्या भागाला धक्का न लागता गाठ काढता यावी व शस्त्रक्रियेतील गुंतागुंत टाळता यावी जसे झटके/आकडी येणे, अर्धांगवायूचा झटका इत्यादी. कवटीवरील त्वचा व मेंदूचे आवरण हे अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे कवटीवरील त्वचेला दोन्ही बाजूने पाच ठिकाणी भूलतज्ज्ञांनी स्थानिय भूल दिली. जेणेकरून शस्त्रक्रियेच्या ठिकाणचा भाग पूर्णत: बधीर झाला व शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रकिया सुमारे 4 तास चालली
रूग्णाची कवटी उघडल्यानंतर भूलतज्ज्ञांच्या सूचनेनुसार न्यूरोसर्जनने मेंदूच्या आवरणाभोवतीचा भाग बधीर केला. शस्त्रक्रिया चालू असताना रुग्ण झोपी जावा व उठल्यावर तत्काळ जागा व्हावा, अशा पद्धतीची गुंगीची औषधे शिरेवाटे देण्यात आली. रुग्णावरील शस्त्रकिया सुमारे 4 तास चालली. संपूर्ण शस्त्रक्रिया दरम्यान रुग्ण जागा होता व वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देत होता.
रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिरगुंडे, डॉ. रुपेश शिंदे, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. इंगळे व डॉ. होम्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. अभिनंदन पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेसाठी बधिरीकरणशास्त्रविभागप्रमुख डॉ. उल्हास मिसाळ यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रियंका राठी, डॉ. रुपाली गोरगिळे, डॉ. शोभा पारे व डॉ. आदित्य वेल्हाळ यांनी कौशल्यपूर्वक भूल दिली.
इतर महत्वाच्या बातम्या