(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्स्प्रेसला सांगलीत थांबा; गुजरात, राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय
Sangli News : विशेषतः सांगली जिल्ह्यातील जे विद्यार्थी राजस्थानमधील कोटा आयआयटीमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना सांगली रेल्वे स्टेशनवरुन थेट तिथे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे.
सांगली: सांगली (Sangli News) रेल्वे स्टेशनवर मिरज-निजामुद्दीन दिल्ली दर्शन एक्सप्रेसला थांबा मिळाला आहे. खासदार संजय पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन सांगलीत दर्शन एक्स्प्रेस, चंदीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती व निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती या तीन रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. दर्शन एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. दर्शन एक्स्प्रेसचा सांगलीत थांबा मिळाल्याने सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची लोकांची दिल्ली, गुजरात, राजस्थान जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. सांगलीसह (Sangli Latest News) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनाही मोठा लाभ होणार आहे. राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा असलेली नवीन सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस केवळ 25 तासात दिल्लीत पोहोचत असल्याने प्रवाशांनी सोय होणार आहे.
दर्शन एक्स्प्रेस मार्ग कसा असेल?
दर्शन एक्स्प्रेस प्रत्येक रविवारी सकाळी 5 वाजता सांगलीमधून सुटून कराड, सातारा, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण (मुंबई), वसई रोड (मुंबई), वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा येथे थांबून दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरुन प्रत्येक शुक्रवारी रात्री 9:40 वाजता सुटून कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वापी, वसई रोड (मुंबई), कल्याण, मुंबई, लोणावळा पुणे, जेजुरी, सातारा, कराड येथे थांबून सांगली रेल्वे स्टेशनला शनिवारी पहाटे 12:45 ला पोहोचेल.
सांगलीतून कोटा आयआयटीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा
विशेषतः सांगली जिल्ह्यातील (Sangli) जे विद्यार्थी राजस्थानमधील कोटा आयआयटीमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांना सांगली रेल्वे स्टेशनवरुन थेट कोटा इथे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे. सांगलीत थांबा मिळण्यासाठी रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद भाऊ देशपांडे, सांगली रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उमेश शहा, सुकुमार पाटील यांनी तांत्रिक बाबतीत रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर याबाबतीत पत्रव्यवहार केला होता.
आणखी गाड्यांचा विस्तार होणार?
दरम्यान, पुणे ते मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने पुण्यातील आणखी काही एक्स्प्रेस गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तार होणार आहे. या साप्ताहिक एक्स्प्रेसमुळे मिरजेतून दिल्लीला जाण्यासाठी दैनंदिन गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस, आठवड्यातून चार दिवस संपर्क क्रांती एक्स्प्रेस, साप्ताहिक कोल्हापूर- निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन यासह दर्शन एक्स्प्रेसची सोय झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या