Manoj Jarange : 'भोकरदनच्या नेत्याच्या कपाळाला आयुष्यभर गुलाल लागणार नाही'; जरांगेंचा रावसाहेब दानवेंवर पुन्हा हल्लाबोल
Manoj Jarange : "समाजाने ठरवले तर भोकरदनच्या नेत्याच्या आयुष्यभर कपाळाला गुलाल लागणार नाही, थेट ऊसतोडणीची वेळ येईल," अशी टीका जरांगे यांनी केली आहे.
सांगली : जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदनमध्ये काही दिवसांपूर्वी गाव बंदीचा बॅनर लावलं म्हणून, मराठा तरुणांना मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, याच घटनेवरून मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) सतत भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर नाव न घेता टीका करत आहे. आज सांगली येथील सभेत देखील जरांगे यांनी पुन्हा एकदा दानवेंवर हल्लाबोल केला आहे. "समाजाने ठरवले तर भोकरदनच्या नेत्याच्या आयुष्यभर कपाळाला गुलाल लागणार नाही, थेट ऊसतोडणीची वेळ येईल," अशी टीका जरांगे यांनी केली आहे.
सांगली येथील सभेत बोलतांना जरांगे म्हणाले की, "भोकरदनला एक नेता आहे. त्याला एका गावात जायचं होतं. पण आपल्या लोकांनी गाव बंदीचं त्या गावात बोर्ड लावला होता.मात्र, बोर्ड काढून मला गावात येऊ द्या असं त्याचं म्हणणं होतं. पण बोर्ड तसाच ठेवून गावात जायला काय हरकत होती. मात्र,गावात येण्यासाठी तरुणांना मारहाण करण्यात आली. तू नुसता बोर्ड फाडला आहे, पण मराठ्यांनी जर ठरवलं तुझ्या अंगावरील कपडे देखील फाडून टाकतील. तसेच, मराठा समाजाने जर ठरवलं तर, आयुष्यभर तुझ्या कपाळाला गुलाल लावू देणार नाही. तुला थेट ऊस तोडीला जावं लागेल, असे जरांगे म्हणाले.
ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव
मराठा आरक्षणाची लढाई एकजुटीमुळे अंतिम टप्प्यात आली आहे. मराठ्यांची पुरावे नाही असं अनेकदा सांगण्यात आलं. मागील 70 वर्षात काही ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता. पुरावे नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही, असं प्रत्येक वेळा सांगितलं जात होतं. पण आता महाराष्ट्रभरात पुरावे सापडत आहे. मराठ्यांची एकजूट पाहता सरकारने पुरावे शोधायला सुरुवात केली,असे जरांगे म्हणाले.
विटा शहराने मराठा आरक्षणासाठी एकजूट दाखवली
आमच्या मराठवाड्यात एक बातमी पसरवली, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एकत्र येत नाही. पण ज्याने ही बातमी पसरवली त्याने एकदा सांगलीमधील विटा येथील सभा येऊन पाहावी. या सभेतील गर्दीतून जाता येणार नाही. या विटा शहराने मराठा आरक्षणासाठी एकजूट दाखवली आहे. शहरातील आज सर्व दुकाने आणि मार्केट बंद ठेवून आरक्षणाला पाठींबा दिला आहे. एवढ्या सभेत असे पहिल्यांदा पाहायला मिळाले , असल्याचे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : 'तर दोन तासांत मराठा आरक्षण मिळेल', ओबीसी सभेपूर्वी मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य