(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Jayant Patil on Sadabhau Khot : शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
सांगली : शरद पवारांनी (Sharad Pawar) बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? असे म्हणत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या टीकेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या जोरदार पलटवार केला जात आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावरून भाजपवर निशाणा साधलाय.
भाजपने डॉग स्क्वाड बाळगले
जयंत पाटील म्हणाले की, ही दुर्देवी घटना आहे. अशी माणसं भाजपने बाळगली आहे. डॉग स्क्वाड बाळगले आहेत. या प्रकाराला देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे का? याचा खुलासा करावा. सदाभाऊ खोत यांनी असे वक्तव्य केले आहे याचे प्रायश्चित्त करावे लागेल. भाजपमधील काही लोक शरद पवार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका करतात आणि आमदारकी मिळवत असतील तर भाजपचा विचार त्यांना लखलाभ असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
सदाभाऊ खोतांनी मागितली माफी
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली आहे. मी बोललेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे. कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो. एखादी व्यक्ती आभाळाकडे बघून बोलत असेल तर आम्ही त्याला आरशात बघ असं म्हणतो. गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं. मातीमध्ये राबावं लागतं. मातीमध्येच मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
अजितदादांचा सदाभाऊ खोतांना फोन
दरम्यान अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना थेट फोन कॉल करून आपली नाराजी व्यक्त केली. सदाभाऊ खोत यांनी काल जे काही वक्तव्य केलं, ते निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दांत मी कालच निषेध केला आहे. मी फक्त एवढ्यावरच थांबलेलो नाही. मी खोत यांना फोनही केला होता. तुमचं हे स्टेटमेंट आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा, असं मी त्यांना सांगितलं. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलणं, हे चुकीचं आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा