Ajit Pawar: महाराष्ट्रात अजित पवारांच्या जवळपास 60 सभा; दिवसाला होणार 5 सभा, नरेंद्र मोदींच्या सभेला राहणार उपस्थित
Ajit Pawar: अजित पवारांच्या दिवसाला 5 सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन तीन सभांना अजित पवार उपस्थित असणार आहेत.
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी राज्यभरामध्ये प्रचारसभांचा मोठा धडाका लावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या उद्यापासून महाराष्ट्रभरात सभांचा धडाका सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात अजित पवारांच्या जवळपास 60 सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या दिवसाला 5 सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन तीन सभांना अजित पवार उपस्थित असणार आहेत.
ज्या ठिकाणी मोदींची सभा असेल तिथे राष्ट्रवादीचा एक मोठा नेता व्यासपीठावर असणार आहे. अजित पवारांच्या सभा असल्याने सगळ्याच ठिकाणी शक्य होणार नाही, यासाठी राष्ट्रवादीचा एक नेता सभेसाठी उपस्थित असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहेत. अजित पवारांच्या राज्यभरात जवळपास 60 सभा होणार आहेत.
नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात
नरेंद्र मोदींचा (Narendra modi) महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून विधानसभा निवडणुकांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत.
राज्यात 8 तारखेला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकंच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राला 2 सभा दिल्या आहेत. त्यापैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल, मोदींच्या या दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक होतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. नाशिकच्या ग्राउंडला तर मोदी ग्राउंड नाव दिले आहे, येथे लाखोंची सभा होईल, असेही महाजन यांनी सांगितले.
भाजपने केंद्रीयमंत्र्यांनाही महाराष्ट्राच्या प्रचारयंत्रणेत उतरवले आहे. त्यामुळे, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या केंद्रातील नेत्यांच्याही सभा होणार आहेत. त्यातच, नरेंद्र मोदी हेही महाराष्ट्रात जास्त वेळ देतील. याशिवाय, धुळ्याला, नंदुरबारलाही जाणार आहेत. अहमदनगरसह 5 जिल्ह्यांत मोदींच्या सभांचं दौऱ्याचं नियोजन असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
चार दिवसात मोदींच्या 9 सभा होणार
नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.