Sangli News: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सांगलीत उद्या भव्य सत्कार; लोकसभेसाठी काँग्रेस करणार शक्तीप्रदर्शन
25 जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
Sangli News: सांगली लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. जिल्हा काँग्रेसकडून उद्या 25 जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस मोठे शक्तिप्रदर्शन करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकेल असे दिसते. सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभा जागेवर राष्ट्रवादी अजून तरी अप्रत्यक्ष दावा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यमान भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा आपल्यालाच लोकसभेचं तिकीट मिळेल असे गृहीत धरून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे मागीलवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोकसभा लढवलेले विशाल पाटील काँग्रेसकडून तिकीट मिळवण्याच्या आशेवर पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपची सत्ता उलथवली
कर्नाटकमध्ये करिष्मा घडवत काँग्रेसने भाजपची सत्ता उलथवून टाकल्यानंतर सिद्धरामया कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. हाच चेहरा काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये वापरून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच सांगलीमध्ये 25 जून रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी सिद्धरामय्या यांचा भव्य सत्कार घेण्याबरोबरच भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा होत आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विश्वजीत कदम हे या मेळाव्याचे आणि सत्कार समारंभाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
राष्ट्रवादीकडून सांगलीवर अप्रत्यक्ष दावा
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे लोकसभेची जागा गेली होती. विशाल पाटलांनी ही निवडणूक लढवली आणि दोन नंबरची मते मिळाली. आता मात्र काँग्रेसकडे ही जागा राहावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभेवर नजर आहे. प्रत्यक्ष जरी या जागेची अजून राष्ट्रवादी मागणी करत नसली तरी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीकडे हे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ जावेत अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. मात्र, सांगलीची लोकसभेची जागा काँग्रेसचीच आहे. आमचा या जागेवर पूर्ण अधिकार आहे. ती कोणत्याही एका विशिष्ट गटाची नसून पूर्ण पक्षाची आहे असे विश्वजित कदम म्हणाले. यावर जयंत पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मात्र, लोकसभा किंवा विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीतच निर्णय घेतला जाईल, असं सांगत सावध भूमिका घेतली.
भाजपकडून तिकिटाची संजय पाटलांना आशा
दुसरीकडे सांगली लोकसभेवर पुन्हा भाजपकडून आपल्यालाच तिकीट मिळेल या आशेने विद्यमान खासदार संजय काका पाटील पुन्हा सक्रिय झालेत. मागील लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर आपल्या विरोधात होते, पण आता गोपीचंद भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची मत देखील आपल्यालाच मिळतील असा देखील विश्वास संजय काका पाटील यांना आहे. तर जत्रा आली म्हणून सराव करणाऱ्यामधला मी पैलवान नाही; निवडून येण्यासाठी कायम लोकांच्यामध्ये राहावं लागतं असे म्हणत संजयकाका पाटलांनी लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक असलेले विशाल पाटलांना टोला हाणला आहे. या टीकेला विशाल पाटील यांनी अजून तरी समोर न येता सोशल मीडियाद्वारे भाजपच्या खासदारांनी नऊ वर्षात काय केलं असा सवाल केला आहे. नाकी नऊ आलेले नऊ वर्ष असे कॅम्पेन राबवत खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केलं?असा सवाल विचारत आहेत.