Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
सांगलीची जागा ठाकरेंना सोडणं चूकच असल्याचं विश्वजित कदम यांनी ठणकावून सांगितलं. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पाटोले यांच्यासमोर विश्वजित कदम यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले.
सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटामध्ये आणि काँग्रेसमध्ये रंगलेला वाद अजूनही शमण्याचे चिन्ह नाहीत. आज (25 एप्रिल) काँग्रेसचा मेळावा सांगलीमध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी घणाघाती भाषण करत गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघांमध्ये केलेली तयारी तसेच गेल्या तीन महिन्यांपासून सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसलाच मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नांवरती भाष्य केलं.
सांगलीची जागा ठाकरेंना सोडणं चूकच असल्याचं विश्वजित कदम यांनी ठणकावून सांगितलं. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पाटोले यांच्यासमोर विश्वजित कदम यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले. त्यामुळे काँग्रेस नेते काय बोलणार? याकडे लक्ष होते. मेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, तसेच नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा धर्म समजावून सांगताना जागा वाटपामध्ये आलेल्या अडचणींवर भाष्य केले.
विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही?
सांगलीमध्ये आज काँग्रेसचा मेळावा होत असल्याने बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांवर काय कारवाई होणार? याकडे लक्ष होते. कोल्हापूरमध्ये बंडखोरी केलेल्या माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, विशाल पाटील यांच्यावर कोणतीच कारवाई अजून झालेली नाही. त्यामुळे सांगलीमध्ये आल्यानंतर कोणती घोषणा होणार? याकडे लक्ष लागले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विशाल पाटील यांच्यासंदर्भात अहवाल तयार करून दिल्लीला पाठवला जाईल, असे म्हटले आहे. तेथून जो निर्णय येईल तो घेऊ असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी सबुरीचे धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी जागावाटपात तीन पक्ष आल्यानंतर जी अडचण होते ती सुद्धा समजावून सांगत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांमध्ये विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. नाना पटोले भाषणाला उभा राहिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली. विश्वजीत कदम कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला आवाज काढायचा नाही, असा दम ठाकरे गटाला दिला आहे.