Lumpy Skin Disease : सांगली जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाने बाधित होऊन पहिला बळी, 4 महिन्याचे वासरू मृत्यूमुखी
Lumpy Skin Disease : पशुधनांमधील लम्पी चर्मरोगाची दहशत वाढतच चालली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मोराळे गावामधील 4 महिन्याचे वासरू लम्पी आजाराने बाधित होऊन मृत्युमुखी पडले आहे.
Lumpy Skin Disease : पशुधनांमधील लम्पी चर्मरोगाची दहशत वाढतच चालली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील मोराळे गावामधील 4 महिन्याचे वासरू लम्पी आजाराने बाधित होऊन मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोगाची लागण होऊन सांगली जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 5 किमी परिसरातील आतापर्यंत दीड हजार जनावरांचे लसीकरण केलं आहे. वासराचा मृत्यू झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. नियमानुसार या वासराचे दफन करण्यात आले.
जनावरांमधील लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
जनावरांमध्ये आलेल्या लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सुसज्ज आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत जवळपास 20 हजार जनावरांचे या अनुषंगाने लसीकरण करण्यात आले असून गाय व म्हैस वर्गीय जनावरांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची लक्षणे आढळल्यास बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना वेगळे ठेवण्यात यावे, एखाद्या जनावरांमध्ये लक्षण आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास तत्काळ संपर्क साधावा. अथवा 1962 या टो फ्री क्रमांकावरही संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, सांगली जिल्ह्यामध्ये गो वर्गीय पशुधन 3 लाख 24 हजार 756 व म्हैस वर्गीय पशुधन 4 लाख 93 हजार 958 इतके आहे. जिल्ह्यात राज्य शासनाच्या 51 व जिल्हा परिषदेच्या 102 अशा एकूण 153 पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत लम्पी चर्मरोगाने बाधित झालेल्या पशुधनाची संख्या 38 असून वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 33, पलूस तालुक्यात 4, मिरज तालुक्यात एक अशा पशुधनाचा समावेश आहे.
बाधित पशुधनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
लम्पी चर्मरोग बाधित पशुधनास मिरज तालुक्यातील खोतवाडी, नांद्रे येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी बाधित पशुधनाची पाहणी करून ग्रामपंचायत सरपंच व इतर पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी, व तलाठी तसेच ग्रामस्थ यांना लम्पी चर्मरोगाबाबत करावयाच्या उपायोजना व लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या