Sangli News : थेट सांगली जेलच्या स्वच्छतागृहातून चक्क गांजाचा धूर; तीन आरोपींनी चिलिम बनवून गांजा ओढला
Sangli Jail : अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांवर आता सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli Jail : सांगली जिल्हा कारागृहातील स्वच्छतागृहात गांजा ओढताना तिघे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन बाबासाहेब चव्हाण, किरण लखन रणदिवे आणि सम्मेद संजय सावळवाडे अशी तीन न्यायालयीन बंदींची नावे आहेत. याप्रकरणी कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली.
तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
संशयित सचिन चव्हाण, किरण रणदिवे, सम्मेद सावळवाडे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या ते न्यायालयीन बंदी असून सांगली जिल्हा कारागृहात तिघांची ओळख झाली आहे. दि. 29 रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बरॅक क्रमांक तीनच्या स्वच्छतागृहात तिघेजण औषध गोळ्यांचे रिकामे पाकिट गोल गुंडाळून त्यात गांजा भरून चिलिमसारखे तयार करून ते ओढत होते. सुभेदार सूर्यकांत पाटील व हवालदार बबन पवार, शिपाई हणमंत पाटणकर हे बॅरेक क्रमांक 3 मध्ये राऊंड घेत होते. त्यावेळी तिघेही स्वच्छतागृहात गांजा ओढताना दिसून आले. त्यामुळे तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलिम बनवून गांजा ओढल्याचे दिसून आले. अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांवर आता सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांजा ओढणारे ते तीन आरोपी कोण?
दरम्यान, सचिन चव्हाणला तीन साथीदारांसमवेत गांजा तस्करीप्रकरणी अटक करून 20 लाखाचा गांजा जप्त केला होता. किरण रणदिवे हा बांधकाम व्यवसायिक माणिक पाटील यांच्या खुनातील संशयित आहे. सम्मेद सावळवाडे हा सुद्धा खुनातील संशयित आहे. त्याने दोघांच्या सहाय्याने तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























